Join us  

‘आरटीओ’च्या केंद्रांची रखडपट्टी, अद्ययावत तपासणी केंद्रांसाठी शासनाच्या मंजुरीची प्रतीक्षा 

By नितीन जगताप | Published: March 25, 2023 1:04 PM

रिक्षा, टॅक्सी, खासगी बस, बेस्ट बस, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्या यांसह अन्य व्यावसायिक व अवजड वाहनांची ‘आरटीओ’त तपासणी होते.

मुंबई : वाहनांच्या तपासणीत सुसूत्रता यावी, यासाठी मुंबईसह राज्यात २३ परिवहन विभागांकडून ‘आरटीओ’चे अद्ययावत स्वयंचलित तपासणी केंद्र उभारण्यात येणार आहे. यामध्ये मुंबईतील तीन केंद्रांचा समावेश आहे. मुंबईत वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर या अद्ययावत स्वयंचलित वाहन तपासणी केेंद्राचा मोठा फायदा मुंबईकरांना होणार आहे. मात्र,  गेल्या वर्षभराहून अधिक काळापासून स्वयंचलित वाहन तपासणी केंद्राची प्रक्रिया सुरू आहे. या कामासाठी निविदा निघाल्या आहेत; मात्र अद्यापही शासनाकडून त्याला मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे या वाहन तपासणी केंद्रांची रखडपट्टीच सुरू असल्याचे उघड झाले आहे. 

रिक्षा, टॅक्सी, खासगी बस, बेस्ट बस, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्या यांसह अन्य व्यावसायिक व अवजड वाहनांची ‘आरटीओ’त तपासणी होते. प्रथम नवीन वाहन नोंदणी करताना तपासणी होते. त्यानंतर दुसरी तपासणी दोन वर्षांनी आणि मग दरवर्षी तपासणी केली जाते. ब्रेक, प्रदूषण, वाहनांचे सस्पेन्शन, चाक, वेग, हेडलाइट इत्यादींची तपासणी केली जाते; मात्र कर्मचाऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या वाहन तपासणीसाठी बराच वेळ लागतो. याशिवाय तपासणीत सुसूत्रताही येत नाही. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयानेही वाहन तपासणीसाठी २५० मीटरचा ब्रेक टेस्ट ट्रॅक असणे आवश्यक असल्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ‘आरटीओ’त  टेस्ट ट्रॅक उभारण्यात येत आहे.

दिवसाला २०० हून अधिक वाहनांची होणार तपासणीपरिवहन विभागाकडून ऑक्टोबर २०१५ मध्ये नाशिकमधील पंचवटी परिसरात स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र उभारण्यात आले आहे. स्वयंचलित केंद्र उभे राहिल्यास दिवसाला जवळपास एका ठिकाणी  २०० पेक्षा जास्त वाहनांची तपासणी होईल. मानवी हस्तक्षेपाशिवाय वाहनांची तपासणी बारकाईने होणार, स्वयंचलित तपासणी यंत्र, टेस्ट ट्रॅक याशिवाय अन्य मोठी यंत्रणा उभारली जाईल. 

तपासणी मुंबईत कुठे होणार? राज्यात परिवहन विभागाकडून मुंबईतील एसटीच्या कुर्ला नेहरूनगर आगाराबरोबरच ताडदेव आणि अंधेरी येथे स्वयंचलित तपासणी केंद्र उभारण्यात येणार आहे.

एक वर्षाहून अधिक काळापासून स्वयंचलित वाहन तपासणी केंद्राच्या कामाची प्रक्रिया सुरू आहे. या कामासाठी निविदा निघाल्या आहेत.  निर्णय घेण्यासाठी प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. - विवेक भिमनवार, परिवहन आयुक्त

टॅग्स :मुंबई