सजल्या बाजारपेठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2016 06:09 AM2016-09-02T06:09:44+5:302016-09-02T06:09:44+5:30

अगदी काही दिवसातच सगळ््यांचा लाडका बाप्पा येणार म्हटल्यावर त्याच्या तयारीसाठी सारी मुंबापुरी सज्ज झाली आहे. बाजारपेठा ‘बाप्पामय’ झाल्या असून खरेदीला अगदी

Decorated markets | सजल्या बाजारपेठा

सजल्या बाजारपेठा

Next

मुंबई: अगदी काही दिवसातच सगळ््यांचा लाडका बाप्पा येणार म्हटल्यावर त्याच्या तयारीसाठी सारी मुंबापुरी सज्ज झाली आहे. बाजारपेठा ‘बाप्पामय’ झाल्या असून खरेदीला अगदी उधाण आले आहे. त्यामुळे बाप्पाचे अलंकार- आरास, गृहसजावट अशा सगळ््याच वस्तूंची बाजारात रेलचेल दिसून येते आहे.
बाप्पाच्या आगमनासाठी अगदी काहीच दिवस शिल्लक आहेत. बाप्पाच्या स्वागतासाठी सारी मुंबापुरी सजली असून दादर, परळ,हिंदमाता, लालबाग यासारख्या ठिकाणी मुंबईकरांनी खरेदीसाठी गर्दी केलेली आहे. सजावटीचे अनेक नवे ट्रेंड सध्या पाहायला मिळत असून अनेकांना या सजावटीच्या वस्तूंनी आकर्षित केले आहे. यंदा पडद्यांचे विविध प्रकार, फुलांच्या माळा, फुलांचे गुच्छ, लाईटिंग असे बरेच काही जुन्याला नवा टच दिलेल्या वस्तू आहेत.विशेष म्हणजे यंदा वॉशेबल वस्तूंची अधिक चलती आहे. सुंदर फुले, फुलांच्या माळा यात उपलब्ध आहेत. म्हणूनच अनेकांनी थर्माकोलच्या डेकोरेशनपेक्षा वॉशेबल सजावटीच्या वस्तूंना अधिक पसंती देत अधिक खरेदी केल्याचे विक्रेते सांगतात. लाईटच्या माळांभोवती पान, फुले, कंदील अशी सजावट करण्यात आली आहे.या शिवाय अनेक सजावटींच्या साहित्यांनी बाजार फुलला आहे. (प्रतिनिधी)

महागाईचा विचार करता रोशणाईमुळे विजेचे बिल कमी यावे, असे दिवे सध्या बाजारात आहेत. विविध प्रकाराचे पण कमीतकमी वीज घेणारे दिवे अनेकांच्या पसंतीस उतरत आहेत. रोशणाईला अधिक सुंदर बनविण्यासाठी फुले, पानांची सजावट करण्यात आली आहे.

कंठी : बाप्पाला घातला जाणारा हा दागिना अगदी हमखास खरेदी केला जातो. यंदाही बाजारात कंठीच्या वेगवेगळ्या डिझाईन्स पाहायला मिळत आहेत. मोती, खड्यांनी सजवलेल्या कंठ्यांना अनेकांनी पसंती दिली आहे. यंदा नव्या डिझाईन्सना पारंपरिक दागिन्यांचा टच देण्यात आला आहे. या कंठ्या साधारणत: ३० रुपयांपासून ते अगदी २ हजारांच्या पुढे आहेत.

फेटे : बाप्पाला फेटा अगदी शोभून दिसतो. यंदाही फेट्यांचा ट्रेंड असून दादर, भायखळा, परळ येथील बाजारांमध्ये फेटे अगदी हमखास नजरेस पडत आहेत. विशेष म्हणजे फेट्यांना अधिक टेंड्री बनविण्यासाठी यावर मोती, खडे यांची सजावट करण्यात आली आहे. ७० रुपयांपासून हे फेटे अनेक ठिकाणी उपलब्ध आहेत. यात केशरी, लाल, पिवळा, हिरवा असे रंग आहेत.

भिकबाळी : बाप्पाच्या कानात शोभून दिसणारा भिकबाळी हा दागिना यंदा नव्या रूपात पाहायला मिळत आहे. केवळ मोती आणि खडे न ओवता मल्टी कलर स्टोन आणि मोती ओवून तयार केलेले पाहायला मिळत आहे. यातही वेगवेगळे आकार आहेत. साधारण सिंगल मोत्याची भिकबाळी ५० रुपयांपासून आहे. व्हरायटीनुसार यांच्या किमतीत फरक पडतो.

मखर : पर्यावरणाचा विचार करता यंदा अनेकांनी थर्माकोल मखरापेक्षा इकोफ्रेंडली मखरांना पसंती दिली आहे. पुठ्ठ्यांपासून बनविलेले मखर अनेकांच्या पसंतीस उतरत आहे. शिवाय सजावटीच्या विविध साहित्याचा वापर करून तयार केलेले मखरही यंदा पाहायला मिळत आहे. यात वॉशेबल फुलांचा वापर करण्यात आला आहे. या मखरांची किंमत साधारण ८०० रुपयांपासून पुढे आहे.

पडदे : सजावटीसाठी अनेक जण रंगीबेरंगी पडद्यांचा उपयोग करतात. या पडद्यांपासून रेडिमेड डेकोरेशन तयार करण्यात येते. यात झिरमिळ्या आणि रंगीबेरंगी टिकल्यांचा वापर केलेला आहे. विशेष म्हणजे हे पडदे पुन्हा वापरता येण्यासारखे असल्यामुळे अनेक जण या रेडिमेड डेकोरेशन पडद्यांना पसंती देत आहेत. साधे रंगीबेरंगी पडदे २०० रुपयांपासून पुढे आहेत.

सध्या बाजारात वॉशेबल डेकोरेशन खूप सुंदर आहे. बाप्पाच्या विसर्जनानंतरही थर्माकोलपेक्षा याचा वापर अधिक करता येईल, त्यामुळे वॉशेबल डेकोरेशनची खरेदी केली आहे.
- सीताराम कुर्वे, ग्राहक

सजावटीसाठी दरवर्षी काहीतरी नवीन हवे असते. त्यानुसार बदल होत असतात. सध्या सगळ्यांना इकोफ्रेंडली डेकोरेशन करायची इच्छा असते. त्यांच्या मागणीला अनुसरून वस्तू मागविल्या आहेत.
- राजू गुप्ता,
विक्रेता, दादर

Web Title: Decorated markets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.