मुंबई : गणपती बाप्पाच्या आगमनासाठी अवघे पाच दिवस शिल्लक असल्याने मुंबईतील प्रमुख बाजारपेठांमधील गर्दीत दिवसागणिक वाढ होऊ लागली आहे. दरवर्षी महिनाभर गर्दी असलेल्या बाजारपेठा यंदा थोड्या थंडावलेल्या असल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे. मात्र, रविवारी ग्राहकांचा महापूर येण्याची शक्यताही दुकानदारांनी व्यक्त केली आहे.लालबाग येथील विक्रेत्या संपदा यांनी सांगितले की, गणेशोत्सवाआधीचे चारही रविवार बाजारात ग्राहकांची गर्दी उसळते. मात्र गेल्या रविवारचा अपवाद वगळता आधीच्या दोन्ही रविवारी म्हणावी तितकी गर्दी नव्हती. त्याअर्थी शेवटच्या रविवारी मोठ्या संख्येने ग्राहक बाजारात येण्याची शक्यता आहे. प्लॅस्टिकबंदीमुळे कागदी पॅकिंगमध्ये येणाऱ्या वस्तूंच्या भावात किरकोळ बदल झालेला आहे. मात्र त्याचा परिणाम झाल्याचे वाटत नाही. ग्राहक स्वत:ची कापडी पिशवी घेऊन खरेदीसाठी येत आहेत. तरीही बाजारपेठेत गेल्या १० वर्षांत झालेल्या गर्दीच्या तुलनेत यंदा कमी ग्राहक दिसत आहेत. कदाचित शेवटच्या चार दिवसांत ग्राहक मोठ्या संख्येने खरेदीसाठी येण्याची शक्यता आहे.सोने बाजारानेही बाप्पाच्या आगमनाने झळाळी घेतली आहे. बाप्पाच्या आगमनासाठी महिलांकडून सोने खरेदीला पसंती मिळत असल्याचे मुंबई ज्वेलर्स असोसिएशनचे प्रवक्ते कुमार जैन यांनी सांगितले. जैन म्हणाले की, सोने आणि चांदीपासून तयार केलेल्या कंठी, मोदक, दूर्वा अशा विविध अलंकार आणि आभूषणे खरेदीला ग्राहकांची पसंती मिळत आहेत. काही ग्राहकांकडून चांदी व सोन्याच्या स्वरूपात छोट्या गणेशमूर्ती खरेदी केल्या जात आहेत.>बजेट कोलमडणारप्लॅस्टिकचे ताट, वाट्या आणि ग्लास यांवर आलेल्या बंदीमुळे गणेशोत्सवातील बजेट कोलमडणार आहे. दर्शनासाठी आलेल्या नातेवाइकांसह पूजेवेळी सरबत आणि जेवणासाठी मोठ्या प्रमाणात या साहित्याची गरज भासते. मात्र प्लॅस्टिकबंदीमुळे कागदी आणि पर्यावरणपूरक साहित्य तुलनेने महाग असल्याने बजेट कोलमडत असल्याचे प्रसाद पवार यांनी सांगितले.कापूर महागलाकिरकोळ बाजारात कापूरचे दर कडाडल्याचे दिसत आहे. त्यामुळे एक किलोच्या दरामध्ये पाव किलो कापूर खरेदी करावा लागत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.
पूजेच्या साहित्याने सजल्या बाजारपेठा, ग्राहकांची वर्दळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2018 2:14 AM