येशूच्या स्वागतासाठी गोठा सजावट स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2022 12:21 PM2022-12-12T12:21:30+5:302022-12-12T12:21:46+5:30

-जॉन कोलासो दोन हजारांहून अधिक वर्षांपूर्वीची घटना. इस्रायल सरकारने जनगणनेचा फतवा काढला. कुडकुडणाऱ्या थंडीचे दिवस होते. तरीही सरकारने काढलेला ...

decoration competition for the reception of Jesus | येशूच्या स्वागतासाठी गोठा सजावट स्पर्धा

येशूच्या स्वागतासाठी गोठा सजावट स्पर्धा

googlenewsNext


-जॉन कोलासो
दोन हजारांहून अधिक वर्षांपूर्वीची घटना. इस्रायल सरकारने जनगणनेचा फतवा काढला. कुडकुडणाऱ्या थंडीचे दिवस होते. तरीही सरकारने काढलेला फतवा ऐकून नोकरीधंद्याच्या निमित्ताने जन्मगावाबाहेर गेलेला प्रत्येक जण आपापल्या गावी जायला निघाला. वाहने नव्हती. त्यामुळे थंडीतच पायपीट करीत सर्व निघाले होते. त्यांच्यामध्ये जोसेफ व त्याची पत्नी मरिया हेही आपल्या बेथलेम गावी निघाले. जोसेफचा सुतारकीचा व्यवसाय होता. तो या व्यवसायानिमित्त नाझरेथ गावी होता. पत्नी गरोदर होती. तिचे बाळंतपणाचे दिवस भरत आले होते. 
एक दिवस अचानक मरियाला  प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या, ऐनवेळी त्यांना बेथलेममधील कोणीही आश्रय दिला नाही. धर्मशाळांही भरलेल्या होत्या. मरियाच्या वेदना पाहून जोसेफची तारांबळ उडाली. शेवटी त्याने जवळच असलेल्या एका घराच्या पडवीतील गोठ्यात आश्रय घेतला. तेथेच मरिया बाळंत होऊन तिला पुत्र झाला. जोसेफ व मरिया यांच्या मदतीला कोणीही नव्हते. शेवटी त्या दोघांनीही आपल्या अपत्याला गुंडाळून गव्हाणीत ठेवले. हे बाळ म्हणजेच येशू ख्रिस्त...!
या घटनेची स्मृती म्हणूनच ख्रिसमसच्या काळात ख्रिस्तीभाविक येशू ख्रिस्तजन्माचा देखावा तयार करीत असतात. पूर्वी चर्चमध्येच छोट्याशा स्वरूपात हा देखावा तयार केला जात असे. १२२३ साली इटलीमध्ये संत फ्रान्सिस ऑफ असिसी यांनी ही प्रथा प्रथम सुरू केली. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या साह्याने एका चर्चमध्ये गोठा बनविला.  
 आता  वसईत अशा देखाव्याचे गावपातळीवर आयोजन करण्यात येते आणि त्यासाठी स्पर्धाही ठेवण्यात येते, सर्वोत्कृष्ट गोठा बनविणाऱ्यांना पुरस्कार देण्यात येतो. स्पर्धा असल्यामुळे गावातील युवकांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळत आहे.  वसईत १५ वर्षांपूर्वी  जलाशय स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी गावतलावातील पाण्यात ख्रिसमस गोठा उभारण्याची संकल्पना प्रथमच राबविणारे विराज आल्मेडा यांनी सांगितले की, त्यात्या वर्षात घडणाऱ्या ठळक घटनांची नोंद ख्रिसमस गोठ्याच्या देखाव्यात घेतली जाते. परंतु, अशा घटनांचा समावेश देखाव्यात करण्यास काही धर्मगुरूंचा विरोध असतो. त्यांच्या मते  अशा घटनांचा समावेश केल्याने ख्रिस्तजन्माच्या घटनेपेक्षा इतर विषयांना अधिक महत्त्व मिळते. तरीही युवक नवनवीन कल्पना व सोबत आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने कोणत्या सामाजिक घटनांवर ख्रिसमस गोठे बनवायचे, याचा विचार करू लागले आहेत.
 

Web Title: decoration competition for the reception of Jesus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.