मुंबई : गणपतीच्या सजावटीची लगबग सर्वत्र सुरू असल्याचे चित्र मुंबापुरीत दिसून येत आहे. यात अंध विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत गणराजाच्या देखाव्याची सजावट केली आहे. दादर पूर्वेकडील दादासाहेब फाळके मार्गावरील श्रीमती कमला मेहता दादर अंधशाळेतील १० अंध मुलींनी मापलावाडीच्या गणपतीच्या देखाव्याची सजावट केली आहे.मापलावाडी गणपतीच्या सजावटीमध्ये अंध मुलींनी चित्र काढून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. चित्रामध्ये एक मुलगा हातात फुगे घेऊन मुक्तपणे संचार करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, त्याचे पाय साखळीने बांधण्यात आले आहेत. एका चित्रात चहाच्या किटलीमध्ये मूल बांधण्यात आले असल्याचे दिसून येत आहे. समाजात बालकामगारांचा वावर असल्याचे भाष्य याद्वारे केले जात आहे. मुलींना घरकामासाठी बांधले जात असल्याचे चित्र अंध मुलींकडून काढण्यात आले आहे.अंशत: अंध आणि अंध मुलींना गणपतीचा देखावा सजावण्याचा पहिलाच अनुभव होता. अतिशय वेगळा आणि खूप चांगला प्रतिसाद या वेळी मिळाल्याचे कमला मेहता दादर अंधशाळेच्या कला शिक्षिका शरयू दराडे यांनी सांगितले. या वेळी सुरेखा जाधव, स्मिता कदम या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. मापलावाडीच्या गणपती मंडळाचे सहसचिव शेखर कांदळेकर यांनी सांगितले की, कर्णबधिर आणि अंध विद्यार्थ्यांना कला क्षेत्रात व्यासपीठ मिळण्यासाठी देखावा सजावटीसाठी या विद्यार्थ्यांची मदत घेतली. बालकामगार, पर्यावरण या विषयांवर मुलांनी डोळसपणे चित्रे काढली आहेत. मंडळाचे यंदाचे ५२वे वर्ष असल्याने मंडळाचे अध्यक्ष राम सावंत आणि मंडळाच्या वतीने ही संकल्पना सुचविण्यात आली. या वेळी कर्णबधिर, अंध विद्यार्थ्यांना बाप्पाची आरास करण्याची संधी मिळाली असल्याचे कांदळेकर यांनी सांगितले.
अंधांनी केली देखाव्याची सजावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2018 2:13 AM