मुंबई - राज्यात सक्रिय रुग्णांच्या संख्येत गतीने घट होत आहे, काही दिवसापूर्वी काही लाखाच्या घरात असलेली ही संख्या आता १ लाख ६१ हजार ८६४ वर आली आहे. तर दैनंदिन रुग्णसंख्येची घसरणही कायम असून, बुधवारी १० हजार ९८९ रुग्ण आणि २६१ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.४५ टक्क्यांवर आहे.
राज्यातील मृत्यूदर सध्या १.७४ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी ७१ लाख २८ हजार ९३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १५.७९ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ११ लाख ३५ हजार ३४७ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, ६ हजार ४९४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ५८ लाख ६३ हजार ८८० झाली असून, मृतांचा आकडा १ लाख १ हजार ८३३ झाला आहे. दिवसभरात नोंद झालेल्या २६१ मृत्यूंपैकी १७० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ९१ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. या २६१ मृत्यूंमध्ये मुंबई २७, ठाणे ३, नवी मुंबई मनपा १, कल्याण डोंबिवली मनपा २, उल्हासनगर मनपा १, भिवंडी निजामपूर मनपा १, पालघर २, वसई-विरार मनपा ५, रायगड ४, पनवेल मनपा १, नाशिक ८, नाशिक मनपा १६, अहमदनगर ६, जळगाव २, पुणे १६, पुणे मनपा ११, सोलापूर ८, सातारा २३, कोल्हापूर ३१, कोल्हापूर मनपा ९, सांगली १५, सांगली मिरज कुपवाड मनपा २, सिंधुदुर्ग १३, रत्नागिरी ६, औरंगाबाद ५, औरंगाबाद मनपा ६, जालना ४, परभणी ३, परभणी मनपा १, उस्मानाबाद ३, बीड १०, नांदेड १, अकोला मनपा १, अमरावती १, वाशिम २, नागपूर मनपा २, वर्धा ५, गोंदिया १, चंद्रपूर ३ इ. रुग्णांचा समावेश आहे.
पालघरमध्ये सर्वांत कमी सक्रिय रुग्ण
राज्यात पुण्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत, त्यांची संख्या १९ हजार २७५ आहे. त्याखालोखाल मुंबईत १७ हजार ९३९, ठाण्यात १६ हजार ७६, कोल्हापूरमध्ये १७ हजार ८२२ आणि सातारा ११ हजार २३२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर राज्यात पालघर जिल्ह्यात सर्वात कमी सक्रिय रुग्ण आहेत, त्यांची संख्या ४४ आहे.