Join us

कृषी क्षेत्रात घट तर उद्योग व सेवा क्षेत्रात वाढ

By admin | Published: March 18, 2015 1:32 AM

राज्यातील दुष्काळी परिस्थिती, अवकाळी पाऊस, गारपीट याचा मोठा फटका राज्यातील कृषी क्षेत्राला बसला असून, मागील वर्षीच्या तुलनेत कृषी क्षेत्रात १२.३ टक्क्यांची घट अपेक्षित आहे.

मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती, अवकाळी पाऊस, गारपीट याचा मोठा फटका राज्यातील कृषी क्षेत्राला बसला असून, मागील वर्षीच्या तुलनेत कृषी क्षेत्रात १२.३ टक्क्यांची घट अपेक्षित आहे. त्याचवेळी राज्याच्या आर्थिक प्रगतीला उद्योग व सेवा क्षेत्राने हातभार लावला असून, उद्योग क्षेत्रात ४ टक्के तर सेवा क्षेत्रात ८.१ टक्के वाढ अपेक्षित आहे. परिणामी, २०१४-१५ या आर्थिक वर्षात राज्याच्या अर्थव्यवस्थेत ५.७ टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. राज्याची महसुली जमा अर्थसंकल्पीय अंदाजाच्या ६३ टक्के असून, राज्यावरील कर्जाने ३ लाख कोटी रुपयांचा आकडा ओलांडला असला तरी स्थूल राज्य उत्पन्नाशी त्याचे प्रमाण १८ टक्के आहे.राज्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे कृषी क्षेत्राला मोठा फटका बसला असल्याचे राज्य सरकारने विधिमंडळात सादर केलेल्या २०१४-१५च्या आर्थिक पाहणी अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे. राज्यात सरासरीच्या ७०.२ टक्के पाऊस झाला आहे. राज्यातील एकूण ३५५ तालुक्यांपैकी (मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यांतील तालुके वगळून) २२६ तालुक्यांत अपुरा, ११२ तालुक्यांत साधारण तर १७ तालुक्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला. खरीप हंगामात १४५.७९ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण करण्यात आली. मागील वर्षीच्या १५०.५६ लाख हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ती ३ टक्के कमी होती. तृणधान्ये, कडधान्ये, तेलबिया व कापूस या पिकाखालील क्षेत्रातही घट झाली. असमाधानकारक पावसामुळे रब्बी हंगामातील क्षेत्रात मागील वर्षीच्या तुलनेत २७ टक्के घट अपेक्षित आहे. एकीकडे कृषी क्षेत्राकरिता हे आर्थिक वर्ष निराशाजनक असताना उद्योग क्षेत्रात ४ टक्के तर सेवा क्षेत्रात ८.१ टक्के दराने वाढ झाली आहे. आॅगस्ट १९९१ ते आॅक्टोबर २०१४ या कालावधीत राज्यात १० लाख ६३ हजार ३४२ कोटी प्रस्तावित गुंतवणुकीच्या १८ हजार ७०९ औद्योगिक प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. त्यापैकी २ लाख ५४ हजार ७८४ कोटी (२३.९ टक्के) रुपये प्रस्तावित गुंतवणुकीचे ८ हजार ३७६ प्रकल्प (४४.८ टक्के) कार्यान्वित झाले. राज्यात डिसेंबर २०१४ अखेर ५० हजार ६३७ कोटी गुंतवणुकीचे व २६.९ लाख रोजगार असलेले सुमारे २ लाख १२ हजार सूक्ष्म, लघू व मध्यम उपक्रम कार्यरत होते.राज्य शासनाची महसुली जमा सन २०१३-१४मध्ये १ लाख ५८ हजार ४१० कोटी होती. सन २०१४-१५मध्ये कर महसूल व करेतर महसूल अनुक्रमे १ लाख ३८ हजार ८५३ कोटी आणि ४१ हजार ४६७ कोटी अपेक्षित आहे. एप्रिल ते डिसेंबर २०१४ या कालावधीत प्रत्यक्ष महसुली जमा १ लाख १४ हजार ६९३ कोटी (अर्थसंकल्पीय अंदाजाच्या ६३.६ टक्के) होती. राज्य शासनाचा सन २०१४-१५ (अर्थसंकल्पीय अंदाज)मधील महसुली खर्च १ लाख ८४ हजार ४२३ कोटी अपेक्षित असून, तो २०१३-१४ (सुधारित अंदाज)मध्ये १ लाख ६१ हजार ४२७ कोटी आहे.अर्थसंकल्पीय अंदाजाप्रमाणे सन २०१४-१५मध्ये महसुली तूट ४ हजार १०३ कोटी, वित्तीय तूट ३० हजार ९६५ कोटी आणि ऋणभार ३ लाख ४७७ कोटी आहे. सन २०१४-१५ (अर्थसंकल्पीय अंदाज)मध्ये वित्तीय तुटीचे स्थूल राज्य उत्पन्नाशी प्रमाण १.८४ टक्के तसेच ऋणभाराचे स्थूल उत्पन्नाशी प्रमाण १७.८१ टक्के अपेक्षित असून, ते १३व्या वित्त आयोगाने ‘एकत्रित वित्तीय सुधारणेचा मार्ग’ अंतर्गत निश्चित केलेल्या मर्यादेत आहे. (विशेष प्रतिनिधी)