मुंबई : मुंबईत दिवाळीनंतर कोरोना चाचण्यांची क्षमता वाढविण्यात आली आहे. मात्र मागील महिनाभरात मुंबईत कोरोना चाचण्यांत दहा टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून आले. मुंबई महानगरपालिकेच्या माहितीनुसार, मुंबईत २१ सप्टेंबर ते २० ऑक्टोबर या काळात ३ लाख ६२ हजार ३३१ कोरोना चाचण्या पार पडल्या. परंतु, मागील महिन्यात यात घट होऊन हे प्रमाण ३ लाख ४८ हजार ८७४ वर गेले. म्हणजेच २१ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर या काळात केवळ २५ टक्के चाचण्या पार पडल्या आहेत.
मुंबईत कोरोना चाचण्यांचे प्रमाण घटल्यामुळे दैनंदिन रुग्णसंख्याही हजारांच्या आत आली होती. नोव्हेंबरच्या सुरुवातीला दिवसाला १३ ते १४ हजार कोरोना चाचण्या करण्यात आल्या, मात्र सणासुदीच्या काळात हे प्रमाण कमी होऊन १० हजारांवर आले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आता कोरोना चाचण्यांच्या क्षमतेत वाढ करण्यात आली आहे. या चाचण्यांमध्ये मुख्यतः फेरीवाले, किरकोळ विक्रेते, सुरक्षारक्षक, फ्रंटलाइन कर्मचारी, पोलीस, कॅटरिंग कर्मचारी, बेस्टचालक, टॅक्सीचालक यांचा समावेश असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. पालिकेचे अतिरिक्त आय़ुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले, १७ नोव्हेंबरनंतर शहर, उपनगरात दैनंदिन कोरोना चाचण्यांत वाढ करण्यात आली असून दिवसाला १० हजार चाचण्या करण्यात येत आहेत. आतापर्यंत १७ लाख ३९ हजार चाचण्या पार पडल्या असून यात पॉझिटिव्हीटी दर १५.६६ टक्के असल्याची नोंद आहे. कोरोना संसर्गाच्या सुरुवातीच्या टप्प्यात रुग्ण निदान होण्यासाठी घरोघरी सर्वेक्षणही सुरू केले असून टप्प्याटप्प्याने चाचण्याही आणखी वाढविण्यात येतील.
दिवसाला १० हजार चाचण्यांची नोंदमुंबईत दिवाळीदरम्यान सर्वात कमी कोरोना चाचण्यांची नोंद झाली. दिवाळीच्या दिवसांत ५ हजार ३९९ आणि ३ हजार ९१८ चाचण्या करण्यात आल्या. यापूर्वी दसऱ्याला सर्वात कमी म्हणजे केवळ ७ हजार ५७६ कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या.