रुग्णांसह कोरोना चाचण्यांच्या दररोजच्या संख्येत घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:07 AM2021-04-28T04:07:07+5:302021-04-28T04:07:07+5:30
मुंबई : राज्यासह मुंबईत लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर आता कोरोनाबाधित रुग्णसंख्येत मोठी घट दिसून येत आहे. गेले दोन दिवस बाधित ...
मुंबई : राज्यासह मुंबईत लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर आता कोरोनाबाधित रुग्णसंख्येत मोठी घट दिसून येत आहे. गेले दोन दिवस बाधित रुग्णांची संख्या सरासरी चार हजारांवर आली आहे. मात्र या काळात मुंबईतील चाचण्यांमध्येही मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे रुग्णसंख्येतील ही घट कमी चाचण्यांमुळे असल्याचा तर्क व्यक्त होत आहे.
मार्च २०२० पासून आतापर्यंत ५३ लाखांहून अधिक लोकांची चाचणी करण्यात आली आहे. यापैकी २२ लाख चाचण्या गेल्या अडीच महिन्यांत करण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रसार झपाट्याने वाढत असल्याने बाधित रुग्णांचा शोध लावून त्यांच्या जवळच्या संपर्कातील लोकांचे विलगीकरण करणे आवश्यक होते. त्यामुळे २३ मार्चपासून दररोज सरासरी ५० हजार लोकांची चाचणी केली जात आहे.
दररोज ५० हजार चाचण्या शक्य नसल्या तरी सरासरी ४० ते ४५ हजार चाचण्या केल्या जात आहेत. मात्र गेल्या काही दिवसांत दररोजच्या चाचणीचे प्रमाण कमी झाले आहे. सोमवारी सर्वात कमी रुग्णांची नोंद झाली. परंतु, त्या दिवशी पालिकेने केवळ २८ हजार चाचण्या केल्या होत्या. तर मंगळवारी ३० हजार चाचण्या करण्यात आल्या असून ४०१४ बाधित रुग्ण आढळून आले आहेत.
तारीख चाचण्या रुग्णसंख्या
२७ ३०,४२८ ४०१४
२६ २८,३२८ ३८७६
२५ ४०२९८ ५५४२
२४ ३९,५८४ ५८८८
२३ ४१,८२६ ७२२१
२२ ४६८७४ ७४१०
२१ ४७२७० ७६८४