बोर्डी : महागाई, मजुरांची उपलब्धता, बियाणे, खते, मोकाट गुरे, कीड रोगाचा प्रादुर्भाव आणि पर्जन्यमान या साऱ्यांचाच परिणाम एकंदर भात उत्पादनावर होत आहे. पावसाअभावी अथवा मुसळधार पावसाने लावणीचा कालावधी बदलत चालला असून त्याचा उत्पादन घटण्यावर परिणाम होत आहे. भातशेती परवडत नसल्याने शेतकरी पाठ फिरवत असून प्रतिवर्षी लागवड क्षेत्रात घट होत चालली आहे.कृषी हवामानानुसार कोकणाचे तीन विभाग आहेत. शेती व पीक पद्धती ठरविण्यात समुद्रापासूनचे अंतर महत्वाचे आहे. त्यानुसार खलाटी, वलाटी, घाटमाथा असे तीन प्रकार मानले जातात. समुद्रापासून १५ ते २० कि. मी. अंतरास खलाटी म्हणतात. डहाणू तालुक्यातील किनाऱ्यालगत गावांचा समावेश होतो. पूर्वी पावसाळ्यात खलाटी क्षेत्रात ९० ते ९५ दिवस पाऊस पडत होता. शेतकरी ९० ते १२० दिवसांच्या भातांच्या वाणाचा वापर करायचे. हल्ली पर्जन्यमान ६० ते ६५ दिवसापर्यंत आले आहे. जुलै महिन्यातील पहिला पंधरवडा भात लावणीकरिता आदर्श समजला जातो. लहरी पावसाने लावणी हंगाम वाढला आहे. ४० ते ४५ दिवसांची रोपे लावणीकरिता वापरावी लागतात. साहजिकच मशागत, बियाणे इ. घटक चांगले असले तरी उत्पादनावर परिणाम होऊन कमी उत्पादन मिळत आहे. यावर्षी पावसाअभावी खरिपातील भात लावणीला उशिरा सुरूवात झाली. दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर परिसरातील नदी, नाले, बंधारे तुडुंब भरले आहेत. भात शेतीत पाणी भरल्याने शेतकऱ्यांनी लावणी थांबवली आहे. बियाणे पेरण्याची व लावणीची वेळ सारखी असल्याने मजुरांचा तुटवडा भासत असून मोकाट गुरे, महागाई, खते, बियाणे, कीडरोगांचा प्रादुर्भाव इ. समस्येला शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागते. पूर्वी पेक्षा उत्पादनातील घट वाढली आहे. भात शेती परवडत नसल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे. तालुक्यातील खरीप भात लागवड क्षेत्र प्रतिवर्षी घटत आहे. कृषी संशोधन केंद्र, कृषी विभाग, कृषी शास्त्रज्ञ आणि राजकीय नेतृत्वाने गंभीर दखल घेणे आवश्यक आहे, अन्यथा भातशेती ओस पडण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
भात लागवड क्षेत्रात घट
By admin | Published: July 18, 2014 12:38 AM