मुंबईच्या क्षयरोग रुग्णाच्या संख्येत घट
By संतोष आंधळे | Published: March 22, 2024 07:39 PM2024-03-22T19:39:23+5:302024-03-22T19:39:44+5:30
मुंबईत बाहेरून उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांच्या संख्येत मात्र वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे.
मुंबई : गेल्या काही वर्षात क्षयरोगाचे उच्चटन करण्यासाठी संपूर्ण देशात प्रयत्न सुरु आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत क्षयरोग नियंत्रणासाठी सातत्याने हाती घेण्यात आलेल्या विशेष उपक्रमामुळे रूग्णसंख्येत घट शक्य झाली आहे. वर्ष २०२२ आणि २०२३ क्षय रूग्णांच्या संख्येची आकडेवारी लक्षात घेतली तर २०२३ साली क्षयरोग रुग्णाच्या संख्येत पाच हजाराने घट झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, मुंबईतील रूग्णसंख्येत एकीकडे घट झालेली असतानाच दुसरीकडे मुंबईत बाहेरून उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांच्या संख्येत मात्र वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे.
मुंबईतील रूग्णांच्या संख्येत घट झाल्याचे दोन वर्षांच्या आकडेवारीतून स्पष्ट होते. मुंबईत वर्ष २०२२ मध्ये ५५ हजार २८४ रूग्ण आढळले होते. तर वर्ष २०२३ मध्ये या रूग्णांची संख्या ५० हजार २०६ इतकी आढळली आहे. महानगरपालिका क्षयरोग नियंत्रण विभागाद्वारे रुग्णांना निदान आणि उपचारामध्ये पुरवण्यात येणाऱ्या सेवा, रुग्णांचा नियमित पाठपुराव्यामुळे आणि अत्याधुनिक निदान चाचणी सुविधा यासारख्या सुविधांमुळे क्षयरुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे.
मुंबई बाहेरून आलेले रुग्ण
२०२२ मध्ये मुंबई बाहेरून आलेले १०४६३ क्षयरोगाचे रुग्ण होते. तर २०२३ मध्ये १३३६९ रुग्ण आहे. त्यामुळे मुंबईत बाहेरून उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांच्या संख्येत मात्र वाढ झाल्याचे दिसत आहे.
क्षयरोगाची प्रमुख लक्षणे-
दोन आठवड्याहून अधिक कालावधीचा खोकला
दोन आठवड्याहून अधिक कालावधीचा ताप
वजन कमी होणे / भूक मंदावणे
रात्री घाम येणे
मानेवर गाठ येणे
बीसीजी लसीकरण
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन प्रकल्प यांचा मुंबईच्या अति जोखमीच्या गटातील लोकसंख्येसाठी प्रौढ बीसीजी लसीकरण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या राष्ट्रीय कार्यक्रम अंतर्गत मुंबईच्या सर्व २४ विभागात चाचण्या राबविण्यात येणार आहेत. १८ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील ६ अतिजोखीम गटातील लाभार्थ्यांची निवड केली जाईल. एकूण ६ अति जोखीम गटामध्ये (१) गत ५ वर्षातील क्षयरोगाने बाधित रुग्ण, (२) मागील ३ वर्षातील क्षयरोग रूग्णांचे घरगुती संपर्कातील व्यक्ती, (३) स्वयंघोषित मधुमेही, (४) स्वयंघोषित धूम्रपान करणारे, (५) कुपोषित, (६) वय ६० वर्षांपेक्षा जास्त अशा रूग्णांचे लसीकरण करण्यात येईल. हे ऐच्छिक लसीकरण आहे, म्हणून पात्र लाभार्थ्यांकडून लेखी संमती घेतली जाईल. त्याची अंमलबजावणी टप्प्य-टप्प्याने केली जाईल. एप्रिल २०२४ मध्ये आरोग्य स्वयंसेविका आणि आशा सेविकांद्वारे पात्र लाभार्थ्यांचे सर्वेक्षण केले जाईल. मे २०२४ मध्ये लसीकरण केले जाईल.