रस्ते अपघातांमुळे गरीब कुटुंबीयांच्या उत्पन्नात घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:07 AM2021-02-15T04:07:16+5:302021-02-15T04:07:16+5:30
मुंबई : रस्ते अपघातामुळे भारतातील ७५ टक्क्यांहून अधिक गरीब कुटुंबांच्या उत्पन्नात घट झाली. गरिबांना सात महिन्यांहून अधिक काळ ...
मुंबई : रस्ते अपघातामुळे भारतातील ७५ टक्क्यांहून अधिक गरीब कुटुंबांच्या उत्पन्नात घट झाली. गरिबांना सात महिन्यांहून अधिक काळ नुकसान सोसावे लागते, तर श्रीमंत कुटुंबांच्या एकूण उत्पन्नातील एका महिन्याचे उत्पन्न कमी होते, असे जागतिक बँकेच्या शनिवारी प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात समोर आले आहे. जागतिक बँक आणि सेव्ह लाइफ फाउंडेशनचा अहवाल नुकताच जाहीर झाला आहे.
गेल्या दशकभरात रस्ते अपघातात १३ लाख लोक मृत्युमुखी पडले आहेत आणि भारतात ५० लाखांहून अधिक जखमी झाले आहेत. भारतातील रस्ते अपघातात होणारे मृत्यू हे जगातील सर्वाधिक आहेत.
शहरी भागात ११.६ टक्क्यांच्या तुलनेत गरीब कुटुंबांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या ४४ टक्क्यांनी वाढली आहे. अल्प उत्पन्न कुटुंबीयांत अपघातानंतर मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या दुप्पट नोंदवली आहे. उच्च उत्पन्न असलेल्या कुटुंबाच्या मृत्यूंची संख्या दुप्पट आहे.
वर्ल्ड बँकच्या २०१८ च्या आकडेवारीनुसार रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये भारत जगात अव्वल स्थानावर असून, त्यात दररोज ४०० हून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात जगातील एकूण वाहनांपैकी १ टक्का वाहने आहेत
दरम्यान, जगभरातील अपघाती मृत्यूंपैकी भारतात मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. त्याचा गरिबीवर परिणाम होतो. भारतात जगातील केवळ १ टक्का वाहने असून, अपघाती मृत्यूंपैकी ११ टक्के मृत्यू होतात. दर चार मिनिटाला एक अपघाती मृत्यू होत आहे, असे जागतिक बँकेचे देशातील संचालक जुनैद कमल अहमद यांनी सांगितले.