Join us

कमाल तापमानात घट; मुंबई ३२.७, मराठवाड्यात पाऊस; विदर्भाला गारांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2020 5:19 AM

मुंबईच्या कमाल तापमानाचा पारा शनिवारी खाली घसरला आहे.

मुंबई : मुंबईच्या कमाल तापमानाचा पारा शनिवारी खाली घसरला आहे. शहराचे कमाल तापमान ३२.७ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. कमाल तापमानात घसरण होत असली, तरीदेखील उन्हाचा तडाखा कायम आहे. परिणामी, मुंबईकरांना उन्हाचे चटके बसतच असून, राज्यातही ठिकठिकाणी हवामानात उल्लेखनीय बदल होत आहेत.अवकाळी पाऊस राज्यात कोसळत असून, १ मार्च रोजी मराठवाड्यात पाऊस तर विदर्भात गारांचा पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविला आहे. राज्यात शनिवारी सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर येथे ११.९ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे, तर उर्वरित भागांत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपासहोते.दरम्यान, २ मार्च रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहील. ३ आणि ४ मार्च रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील.