मुंबईच्या किमान तापमानात घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 01:30 AM2020-06-06T01:30:53+5:302020-06-06T01:30:59+5:30
तब्बल ७ अंश घसरले : २४ तासांत पडलेल्या पावसाचा परिणाम
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : निसर्ग चक्रीवादळाचे ढग विरल्याने शुक्रवारी दिवसभर मुंबईतील आकाश मोकळे राहिले. परिणामी, मुंबईकरांना उन्हाचा तडाखा बसला. दरम्यान, गेल्या २४ तासांत ६५ ते ७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईत सर्वाधिक पाऊस नोंदविण्यात आला. यामुळे किमान तापमानात तब्बल ७ अंशांची घट नोंदविण्यात आली आहे.
मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, निसर्ग चक्रीवादळ आता पूर्णत: विरले आहे. दरम्यान, मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या परिसरासाठी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. मुंबईचा विचार करता हे चक्रीवादळ मुंबईपासून ९० किलोमीटर लांब गेले तरी बुधवारी रात्रीसह, गुरुवारी दिवसा आणि रात्री त्याचा किंचित परिणाम दिसून आला. गुरुवारी दिवसभर मुंबईत ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी कोसळत होत्या. गुरुवारी रात्री बारानंतर मात्र पावसाने ठिकठिकाणी जोर पकडला होता.
सर्वसाधारणपणे दक्षिण मुंबईच्या तुलनेत पूर्व आणि पश्चिम उपनगरात पावसाचा जोर अधिक असतो. मात्र गुरुवारच्या रात्री दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईत पावसाचा जोर अधिक असल्याचे निदर्शनास आले. मुंबई आणि आसपासच्या परिसरात कोसळलेल्या एकूण पावसाची नोंद ६५ ते ७० मिलिमीटर एवढी करण्यात आली. पावसाची बहुतांशी नोंद ही ४ जूनच्या सकाळी ९ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत झाली.
गारेगार वातावरणाचा अनुभव
सलग पडलेल्या पावसामुळे मुंबईच्या तापमानातही घट झाली. मुंबईचे किमान तापमान गुरुवारी २२ अंश नोंदविण्यात आले. जे किमान तापमान बुधवारी २९ अंशांच्या आसपास होते. एका दिवसात किमान तापमानात तब्बल ७ अंशांची घसरण झाली. किमान तापमानात घसरण झाल्याने मुंबईकरांना गारेगार वातावरणाचा अनुभव घेता आला. दरम्यान, बुधवारी आणि गुरुवारी मुंबईकरांना झोडपलेल्या पावसाने शुक्रवारी काहीशी विश्रांती घेतली.