मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:07 AM2021-05-08T04:07:10+5:302021-05-08T04:07:10+5:30
मुंबई : मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस घट दिसून येत आहे. शुक्रवारी ३०३९ रुग्णांची नोंद झाली, तर ४०५२ ...
मुंबई : मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस घट दिसून येत आहे. शुक्रवारी ३०३९ रुग्णांची नोंद झाली, तर ४०५२ रुग्ण कोरोनामुक्त झाले; परंतु दिवसभरात ७१ रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे एकूण मृतांचा आकडा आता १३ हजार ६८७ झाला आहे. रुग्णसंख्येत घट झाल्याने रुग्णवाढीचा सरासरी दैनंदिन दर ०.५१ टक्के एवढा खाली आला आहे. रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी आता १३८ दिवसांवर आला आहे.
आतापर्यंत मुंबईत सहा लाख ७१ हजार ३९४ रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी सहा लाख सहा हजार ४३५ रुग्ण कोरोनामुक्त झाले, तसेच १३ हजार ६८७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या ४९ हजार ४९९ सक्रिय रुग्ण आहेत. शुक्रवारी मृत्युमुखी पडलेल्या ७१ रुग्णांपैकी ४३ रुग्णांना सहव्याधी होत्या. मृतांमध्ये ४५ पुरुष, तर २६ महिला रुग्णांचा समावेश होता. ४९ मृत रुग्ण ६० वर्षांवरील होते, तर १९ रुग्ण ४० ते ६० वर्षांमधील होते. ४० वर्षांखालील तीन रुग्णांचाही मृत्यू झाला. दिवसभरात ३५ हजार २२४ कोविड चाचण्या करण्यात आल्या, तर आतापर्यंत ५६ लाख ४४ हजार ४०२ चाचण्या करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत ९० टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.