मुंबईत म्युकरमायकोसिसच्या रुग्णांमध्येही घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:07 AM2021-06-09T04:07:51+5:302021-06-09T04:07:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे. हळूहळू आता मुंबई यातून सावरत आहे. कोरोनाचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे. हळूहळू आता मुंबई यातून सावरत आहे. कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आल्यानंतर आता आणखी एक सकारात्मक बाब समोर आली आहे. मुंबईत म्युकरमायकोसिसच्या रुग्णांमध्येही घट होत असल्याची माहिती मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दिली.
मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, म्युकरमायकोसिसचे रुग्ण ५० टक्क्यांपेक्षा कमी झाले आहेत. काळ्या बुरशीचे दैनंदिन रुग्ण दाखल हाेण्याचे प्रमाण २ ते ६ वर आले आहे. तसेच, मुंबईबाहेरून उपचारांसाठी येणाऱ्यांची संख्याही कमी झाली आहे. त्यामुळे आता म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भावही कमी होत असल्याने दिलासाजनक स्थिती आहे.
कोरोनामुक्तीनंतर काळ्या बुरशीच्या संसर्गाचे प्रमाण काही दिवसांपूर्वी झपाट्याने वाढताना दिसून आले होते. त्यामुळे या आजारावरील औषधांचा तुटवडाही जाणवत होता. मात्र, पालिकेने यावर नियंत्रण मिळविण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना केली आणि कृती आराखडाही तयार केला. त्याकरिता पालिका रुग्णालयात विशेष खाटांची सोय करून रुग्णांची पोस्ट कोविड स्थितीत कशी खबरदारी घ्यावी, याविषयीही तज्ज्ञांना मार्गदर्शन करण्यात आले होते.
याविषयी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, मुंबई पालिकेला आतापर्यंत ४ हजार ७०० इंजेक्शन्स पुरविली आहेत. यापूर्वी ५० ते १०० रुग्ण दररोज उपचारांकरिता येत होते. त्यात मुंबईतील आणि मुंबईबाहेरील रुग्णांचा समावेश होता. सध्या मुंबईतील सरकारी आणि खासगी रुग्णालयात ३७६ रुग्ण दाखल आहेत. यातील १२१ मुंबईतील आणि २५५ रुग्ण मुंबईबाहेरील आहेत. आतापर्यंत या आजाराने ७० लोकांचा बळी घेतला आहे, ज्यात २१ मुंबईचे, तर मुंबईबाहेरील ४९ रुग्णांचा बळी गेला आहे.
....................................................