मुंबई - मुंबईत म्युकरमायकोसिसच्या रुग्णांमध्ये ५६ टक्क्यांनी घट झाली आहे. सध्या म्युकरचे १६९ रुग्ण उपचाराधीन आहेत. मुंबईमध्ये आतापर्यंत ८२५ काळ्या बुरशीचे रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी ७० टक्के रुग्ण मुंबईबाहेरून उपचारासाठी शहरात दाखल झाले आहेत.
मुंबईत २७ जून रोजी ३८४ सक्रिय रुग्ण होते, तर बुधवारी ही संख्या १६९ झाली आहे. म्हणजेच रुग्णांची संख्या अर्ध्यावर गेली आहे. आतापर्यंत १३९ रुग्ण केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले असून, त्यापैकी ६३ सध्या उपचार घेत आहेत. तर, जेजेमध्ये १४५ वरून १३ रुग्ण, नायरमध्ये ४६ वरून २२, सायनमध्ये ७८ वरून २४ आणि कूपरमध्ये ४२ वरून ११ रुग्ण उपचार घेत आहेत.
उपचारासाठी इंजेक्शनची खरेदी
काळ्या बुरशीच्या उपचारासाठी आतापर्यंत महानगरपालिकेने ३१,२४८ कुपी खरेदी केल्या आहेत. यात इंजेक्शनचे दोन प्रकार आहेत. एका कुपीची सरासरी किंमत सहा हजार रुपये असते, त्यामुळे रुग्णांना केवळ १८ कोटी रुपयांचे इंजेक्शन्स दिली जात आहेत. कोविड-१९ मधील रुग्णांची दैनंदिन संख्या कमी झाल्याने गेल्या एक महिन्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. आता दाखल झालेल्या बहुतांश रुग्णांना इतर रुग्णालयातून पालिकेच्या रुग्णालयाचा संदर्भ दिला जातो.
- सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, पालिका प्रशासन