फुलांच्या किमतीत घट, आवकही वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 07:29 AM2017-10-17T07:29:44+5:302017-10-17T07:29:47+5:30
दिवाळीनिमित्त मुंबईकर खरेदीत व्यस्त झालेले आहेत. बाजारात खरेदी-विक्रीचे, भाव-तोल करण्यांचे चित्र दिसून येत आहे. सणासुदीमुळे फुलबाजार देखील विविध रंगानी रंगलेले असून संपूर्ण बाजार हे सुंगधीमय झालेले आहे.
मुंबई : दिवाळीनिमित्त मुंबईकर खरेदीत व्यस्त झालेले आहेत. बाजारात खरेदी-विक्रीचे, भाव-तोल करण्यांचे चित्र दिसून येत आहे. सणासुदीमुळे फुलबाजार देखील विविध रंगानी रंगलेले असून संपूर्ण बाजार हे सुंगधीमय झालेले आहे. दिवाळी निमित्ताने फुलबाजार विविध प्रकारच्या फुलांनी व रंगांनी फुलला आहे. देशी-विदेशी फुलांची आवक वाढलेली आहे. फुलांचे हार, तोरणे यांची खरेदी जोरात सुरू असून यंदाच्या दिवाळीत फुलांच्या दरात वाढ झालेली नाही, असे विक्रेत्यांनी सांगितले आहे. त्यामुळे ग्राहकांना यांचा दिलासा मिळालेला आहे. झेंडू फुलासह उर्वरित फुलांच्या खरेदी-विक्रीला उधाण आले आहे. नारंगी, पिवळा झेंडूच्या फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे.
घाटकोपर, दादर, परळ, प्रभादेवी, गिरगाव उपनगरे या बाजारपेठांमध्ये फुलांचे साम्राज्य आहे. यंदा दिवाळीत फुलांची मागणी अधिक असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. फुलांनी हातगाड्या, टोपल्या, दुकाने भरली आहेत.
फुलांची खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू असून झेंडूच्या प्रतिकिलो किंमती या ६० रुपये ते ८० रुपये आहे. शेवंती १८० रुपये ते २५० रुपये किलो, मोगरा ६०० रुपये ते ८०० रुपये किलो, अबोली ४०० किलो, शेवंतीची वेणी ६० रुपयापासून ते २०० रुपये पर्यंत आहे. कमळ, गुलाब, चाफा यांच्या किंमती १० ते १५ रुपये आहे. तसेच पुजेसाठी वापरण्यात येणारा दुर्वा, तुळस, आंब्याचे पान, कडुलिंब, केळीचे पान यांची जुडीनुसार किंमत १० ते २० रुपये आहे. अहमदनगर, पुणे, नाशिक, वसई येथून फुले मुंबई व मुंबई उपनगरात येतात. घाऊक आणि किरकोळ किंमतीत १५ ते ३० टक्के फरक जाणवून येतो.