पालिका मैदानांच्या भाड्यात घट, भाडे २७ हजारांवरून ६१० रुपयांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 07:04 AM2018-04-06T07:04:18+5:302018-04-06T07:04:18+5:30
महापालिकेच्या क्रीडांगणावर आयोजित स्पर्धांच्या भाड्यात करण्यात आलेली मोठी वाढ रद्द करण्यात आली आहे. प्रतिदिन २७ हजार रुपये असलेले मैदानांचे भाडे ६१० रुपये करण्यात आले आहे.
मुंबई - महापालिकेच्या क्रीडांगणावर आयोजित स्पर्धांच्या भाड्यात करण्यात आलेली मोठी वाढ रद्द करण्यात आली आहे. प्रतिदिन २७ हजार रुपये असलेले मैदानांचे भाडे ६१० रुपये करण्यात आले आहे. तसेच पाच हजार चौरस मीटरपेक्षा जास्त जागेला प्रतिदिन २४२० रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. तर ५०० चौरस मीटरपेक्षा कमी जागेला १२१० रुपये अनामत रक्कम आणि ३०८ रुपये भाडे भरावे लागणार आहे. यामुळे क्रीडा स्पर्धा आयोजकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
महापालिकेच्या मैदानांवर मुंबईतील अनेक क्रीडा मंडळ, सामाजिक संस्था, शाळांमार्फत स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या मैदानांच्या वापरासाठी पालिका आकारत असलेले भाडे तीन वर्षांपूर्वी वाढविण्यात आले. याबाबत पालिका प्रशासनाने नोव्हेंबर २०१५ मध्ये परिपत्रक काढून ५०० ते १००० चौरस मीटरला प्रतिदिन १५ हजार ५०० आणि १००० चौरस मीटरपेक्षा जास्त जागेला प्रतिदिन २७ हजार भाडे आकारण्यास सुरुवात केली. याचा फटका अनेक क्रीडा आयोजकांना बसला. त्यामुळे ही वाढ रद्द करण्याची मागणी होत
होती.
क्रीडांगणासाठी सात दिवसांचे भाडे तब्बल ५१ हजार रुपये करण्यात आल्याने क्रीडा मंडळांची आर्थिक कोंडी झाली होती. हे भाडे कमी करण्याची मागणी क्रीडा मंडळांकडून होत होती. अखेर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या निर्देशानंतर क्रीडा स्पर्धांसाठी मैदानांचे भाडे कमी करण्यात आले. त्यानुसार पालिका प्रशासनाने १९ जानेवारी २०१८ रोजी सुधारित पत्रक काढून १८ मार्च २०१३ चे जुने परिपत्रक लागू केल्याचे सुधार समिती अध्यक्ष अनंत (बाळा) नर यांनी सांगितले.
स्पर्धांना प्रोत्साहन
च्५०० ते १००० चौरस मीटरला प्रतिदिन १५ हजार ५०० आणि १००० चौरस मीटरपेक्षा जास्त जागेला प्रतिदिन २७ हजार भाडे आकारण्यात येत होते.
च्सात दिवसांचे भाडे तब्बल ५१ हजार रुपये करण्यात आल्याने क्रीडा मंडळांची आर्थिक कोंडी झाली होती.
च्५०० चौरस मीटरपेक्षा कमी जागेला १२१० अनामत रक्कम आणि भाडे प्रतिदिन ३०८ आणि ५ हजार चौरस मीटरपेक्षा अधिक जागेला अनामत रक्कम २४२० रुपये आणि भाडे फक्त ६१० रुपये आकारले जाणार आहे.
च्क्रीडा स्पर्धांना प्रोत्साहन मिळावे यासाठी ही भाडेकपात उपयुक्त ठरणार असल्याचे सुधार समिती अध्यक्ष अनंत (बाळा) नर यांनी सांगितले.