स्पीकरचा आवाज थोडा कमी करा, वर्क फ्रॉम होम सुरू आहे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:06 AM2021-09-18T04:06:41+5:302021-09-18T04:06:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई गणेशोत्सवात भजन, आरत्या आणि भक्तीगीतांच्या नादात आपण सारेच तल्लीन होऊन जातो. अकरा दिवस सर्वत्र भक्तिमय ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई
गणेशोत्सवात भजन, आरत्या आणि भक्तीगीतांच्या नादात आपण सारेच तल्लीन होऊन जातो. अकरा दिवस सर्वत्र भक्तिमय वातावरण असते. सर्वाधिक उत्साह असतो तो सार्वजनिक गणेश मंडपात. गणरायाची गाणी, त्यांना ढोल-ताशांची साथ आणि कानात भरणारा तो सूरमयी आवाज. चतुर्थीचा खरा फील घ्यायचा तर मुंबईतच; पण ''वर्क फ्रॉम होम'' करणाऱ्यांना या आवाजामुळे काही अडचणी जाणवू लागल्या आहेत. स्पीकरचा आवाज मोठा असल्याने फोनवर संभाषण करणे, महत्त्वाच्या ऑनलाइन बैठका, चर्चासत्रांत सहभागी होणे कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे यावर्षी स्पीकरचा आवाज थोडा कमी करा, असे आवाहन नोकरदारांकडून केले जात आहे. त्यांचे नक्की काय म्हणणे आहे, हे जाणून घेण्यासाठी काही नोकरदारांशी प्रातिनिधीक स्वरूपात केलेली चर्चा.
कोरोनाकाळात कंपनीने ''वर्क फ्रॉम होम''चा पर्याय दिला आहे; पण स्पीकरच्या आवाजामुळे कामावरचे फोन कॉल, व्हिडिओ कॉल आणि ग्रुप संवाद करताना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. एकतर लहान आकाराच्या घरात कार्यालयाचे काम व्यवस्थित होत नाही. त्यात दिवसभर स्पीकर सुरू असल्याने त्रासात भर पडत आहे. गणेशोत्सवात हौसमौज करावी, आम्हीही करतो; पण ते करताना दुसऱ्यांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. स्पीकर बंद करा, असे आमचे म्हणणे नाही, पण आवाज थोडा कमी करा.
- वसंत बांदेकर, बोरिवली.
.......
घरातून काम सुरू असल्यामुळे बहुतांश वेळ फोन, कॉन्फरन्स कॉल किंवा व्हिडिओ कॉल अटेंड करण्यात जातो; पण स्पीकरच्या आवाजामुळे आम्ही काय बोलतो, हे समोरच्यापर्यंत पोहोचत नसल्याने कामावर परिणाम होत आहे. बऱ्याचदा वरिष्ठ मंडळी चिडचिड करतात. मग गार्डन किंवा शांत परिसरात जाऊन फोन घ्यावा लागतो. पाऊस असला तर तेही शक्य होत नाही. त्यामुळे मंडळांनी कृपा करून स्पीकरचा आवाज थोडा कमी करावा. आमचा सण साजरे करण्याला अजिबात विरोध नाही. यंदाचे वर्ष फक्त अडचण समजून घ्या.
- संदेश मेस्त्री, अंधेरी.
......
मी एका आघाडीच्या खासगी बँकेत कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करतो. गणपतीतील पहिले ५-६ दिवस वरिष्ठांनी अडचण समजून घेतली; पण आता ते काही ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नाहीत. टार्गेट अजिबात पूर्ण होत नाही. त्यामुळे नोकरी जाण्याची भीती आहे. ऑफिस लोअर परळला आणि मी राहतो विरारला. ट्रेनमध्ये प्रवेश नसल्याने तिकडेही जाऊ शकत नाही. त्यामुळे मंडळांनी उर्वरित २-३ दिवस स्पीकरचा आवाज थोडा कमी करावा.
- अर्जुन परब, विरार.
........
आमच्या परिसरात सकाळी ८ ते दुपारी १ आणि ३ ते रात्री ९ पर्यंत स्पीकर सुरू असतो. त्याचा आवाज इतका मोठा असतो की, कामावर लक्ष लागणे शक्यच नाही. मंडळातील कार्यकर्त्यांना सांगायला जावे, तर ते म्हणतात तुम्हाला आमचेच सणच दिसतात का? अधिक काही बोलावे, तर भांडण होण्याचा संभव. त्यामुळे आणखी २-३ दिवस सहन करण्यापलीकडे दुसरे काहीच करू शकत नाही.
- रवींद्र यादव, कुर्ला.