मुंबई : मतदान केल्यानंतरही सामाजिक परिस्थितीत काहीच बदल होत नाही. परिस्थिती जैसे थे राहते. विकासकामांची पूर्तता होत नाही. परिणामी, निवडणुकीदरम्यान मतदानाचा टक्का घसरतो आणि नागरिकांमध्ये निवडणुकांबाबत कायम निरुत्साह दिसून येतो, असा निष्कर्ष पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटने एका सर्वेक्षणांती काढला.नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये कमी झालेले मतदान आणि मुंबईसह पुणे महानगरपालिका निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरण्यामागील कारणे शोधण्यासाठी गोखले इन्स्टिट्यूटने सर्वेक्षण केले. सर्वेक्षणात मुंबईतील मुलुंड, भांडुप, गोवंडी आणि दक्षिण मुंबई, अंधेरी, बोरीवली या भागांतील वॉर्डांचा समावेश होता. हे सर्वेक्षण पूर्ण केल्यानंतर त्याचा अहवाल गुरुवारी मुंबई मराठी पत्रकार संघात इन्स्टिट्यूटच्या प्राध्यापिका मानसी फडके यांनी जाहीर केला. या वेळी इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. राजस परचुरे आणि राज्य निवडणूक आयोगाचे जनसंपर्क अधिकारी जगदीश मोरे उपस्थित होते. महापालिका निवडणुकीत महिला आरक्षणाला मतदारांनी पाठिंबा दिला. त्यामुळे महिला सशक्तीकरणाला चालना मिळाली. उमेदवार उच्चशिक्षित असल्यास मतदान करण्याची इच्छा निर्माण होत असल्याचे मत मतदारांनी मांडल्याचे अहवालात नमूद आहे.(प्रतिनिधी)मतदान न करण्याची कारणे- मुंबई पालिका निवडणुकांमध्ये सरासरी ४५ ते ५५ टक्के मतदान होते. या निरुत्साहाबाबत नागरिकांनी अनपेक्षित कारणे दिली. त्यापैकी सर्वाधिक नागरिकांनी मतदान करूनही परिस्थितीत सुधारणा नसल्याने मतदान न करणेच योग्य असल्याचे सांगितले.- मतदार यादीत नाव नाही, मी बाहेर होतो अशीही कारणे मतदात्यांनी दिल्याचे इन्स्टिट्यूटच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले.- मी माझ्या दैनंदिन कामात खूपच व्यस्त होतो.- मला वाटत नाही; माझ्या मतामुळे खूप काही फरक पडेल.२० नगरपालिकांतील मतदारांनी नोंदवली आपापली मते - ८४ टक्के लोकांच्या मते उमेदवाराचे वय ४० वर्षांपेक्षा कमी असावे.- ९२ टक्के लोकांच्या मते, उच्चशिक्षित उमेदवाराकडे विकासाची दृष्टी असल्याने उमेदवार पदवीधर असावा.- ९१ टक्के लोकांच्या मते, उमेदवाराची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची नसावी.- ९३.५ टक्के लोकांच्या मते, उमेदवार हा विकासकामे करणारा, उच्चशिक्षित आणि तत्पर असावा.
विकास कामाअभावी घसरते मतदान
By admin | Published: December 30, 2016 3:46 AM