नेस्को कोविड केंद्रातील १,५०० नवीन बेडचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:10 AM2021-05-05T04:10:22+5:302021-05-05T04:10:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गोरेगाव पूर्व येथील नेस्को मैदानावर मुंबई महानगरपालिकेच्या वतीने संचलित समर्पित भव्य कोविड आरोग्य केंद्रातील ...

Dedication of 1,500 new beds at Nesco Covid Center | नेस्को कोविड केंद्रातील १,५०० नवीन बेडचे लोकार्पण

नेस्को कोविड केंद्रातील १,५०० नवीन बेडचे लोकार्पण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गोरेगाव पूर्व येथील नेस्को मैदानावर मुंबई महानगरपालिकेच्या वतीने संचलित समर्पित भव्य कोविड आरोग्य केंद्रातील दुसऱ्या टप्प्याचा भाग म्हणून १ हजार ५०० बेडचे लोकार्पण राज्याचे उद्योगमंत्री व शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या हस्ते साेमवारी सायंकाळी करण्यात आले. या रुग्णशय्यांमध्ये १ हजार रुग्णशय्या प्राणवायूपुरवठा सुविधेसह उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या नवीन क्षमतेसह नेस्को कोविड केंद्राची क्षमता आता ३ हजार ७०० बेड इतकी झाली आहे.

या लोकार्पणप्रसंगी राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) संजीव जयस्वाल, उपायुक्त (विशेष) संजोग कबरे, अधिष्ठाता (टप्पा-१) डॉ. नीलम अंद्रादे, अधिष्ठाता (टप्पा-२) डॉ. राजेश डेरे व अतिरिक्त अधिष्ठाता डॉ. नितीन सलागरे आदी मान्यवर उपस्थित होते.

नेस्को कोविड केंद्रातील ई-सभागृहात एकूण १ हजार ५०० रुग्णशय्या कोविडबाधित रुग्णांवरील उपचारासाठी नव्याने कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. यामध्ये १ हजार बेड प्राणवायूपुरवठा सुविधेसह, तर उर्वरित ५०० सर्वसाधारण बेेड आहेत. प्रत्येक बेडनजीक पंखा, लॉकर व खुर्ची पुरवण्यात आली आहे.

२०० रुग्णशय्या कार्यान्वित करून या सभागृहातील सेवेचा प्रारंभ करण्यात आला आहे. ई-सभागृहात एकूण सहा कक्ष आहेत. प्रत्येक कक्षामध्ये २५० ते ३०० रुग्णशय्यांची क्षमता आहे. सर्व कक्षांमध्ये केंद्रिकृत वातानुकूलन सुविधा आहे, तसेच प्रत्येक कक्षामध्ये २ नर्सिंग स्टेशन, १ अन्न वितरण विभाग, १ अग्निनियंत्रण कक्ष, समवेत २४ x ७ तत्त्वावर कार्यरत फार्मसी कौन्सिलिंग रूम, रुग्णांच्या नातेवाइकांना माहिती पुरवण्यासाठी नियंत्रण कक्षदेखील आहे. एकूण ८ नोंदणी कक्ष, १ निरीक्षण कक्ष (१० रुग्णशय्या), १ क्ष-किरण विभाग कार्यान्वित करण्यात आले आहेत.

या नवीन सुविधेसाठी एकूण १ हजार १०० मनुष्यबळ नेमण्यात आले आहे. त्यात ५० सिनिअर कन्सल्टंट, १६० निवासी वैद्यकीय अधिकारी, ३२० परिचारिका, ४८० रुग्णसेवा सहायक आणि ९० तांत्रिक कर्मचारीवर्गाचा समावेश आहे.

दरम्यान, नेस्को कोविड केंद्राच्या पहिल्या टप्प्यामध्ये एकूण २ हजार २०० बेड रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आले हाेते. त्यामध्ये २०० आयसीयू, तर ३०० प्राणवायूपुरवठा सुविधा असलेले बेड होते. दुसऱ्या टप्प्यातील १,५०० बेडसह या केंद्राची एकूण क्षमता ३ हजार ७०० बेड इतकी झाली आहे. परिणामी, मुंबईतील कोविडबाधितांवरील उपचारांसाठी मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे.

--------- -----------------------------------------

Web Title: Dedication of 1,500 new beds at Nesco Covid Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.