Join us

वर्सोवा येथील क्रीडा अँकॅडमीचा लोकार्पण सोहळा संपन्न

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2020 6:43 PM

Sports Academy at Versova : विविध खेळांमध्ये भविष्यात चांगले खेळाडू निर्माण होण्यासाठी या क्रीडा अँकॅडमीची स्थापना

मुंबई: वर्सोवा मेट्रो स्टेशनजवळ असलेल्या मॉडेल टाऊन रेसिडन्ट असोसिएशनच्या येथील चाचा नेहरू उद्यानातील क्रीडा अँकॅडमीचा लोकार्पण सोहळाआज उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघाचे खासदार गजानन कीर्तिकर यांच्या हस्ते आज दुपारी संपन्न झाला.

पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र(बाळा) आंबेरकर यांच्या संकल्पनेतून पश्चिम उपनगरातून विविध खेळांमध्ये भविष्यात चांगले खेळाडू निर्माण होण्यासाठी या क्रीडा अँकॅडमीची स्थापना करण्यात आली. या ठिकाणी क्रिकेट, फुटबॉल,,मार्शल आर्ट, ॲथलेटीक,रोलर स्केटिंग, सेल्फ डिफेन्स, आरचरी यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तर पालिका शाळेच्या विद्यार्थ्यांना येथे मोफत प्रशिक्षण देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी भारताचे माजी क्रिकेटपटू रमेश पोवार, चिल्ड्रन वेल्फेअर सेंटर हायस्कूलचे प्राचार्य व शिक्षण महर्षी अजय कौल,शिवसेना वर्सोवा विधानसभा संघटक व पालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष यशोधर(शैलेश) फणसे, देवेंद्र आंबेरकर,उपविभागप्रमुख राजेश शेट्ये,उपविभाग प्रमुख हारून खान,प्रभाग क्रमांक 59 च्या नगरसेविका प्रतिमा खोपडे,संस्थेचे अध्यक्ष राजेश ढेरे,सरचिटणीस अशोक मोरे,सल्लागार संजीव कल्ले व अनिल राऊत ,कोच विशाल जैन व दयानंद शेट्टी, काॅस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटीचे सचिव अजित बालन,प्राचार्य वर्षा पूरव व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी खासदार गजानन कीर्तिकर यांनी आपल्या भाषणात या ठिकाणी दर्जेदार क्रीडा नगरी उभारल्याबद्धल त्यांनी देवेंद्र आंबेरकर यांचे कौतुक केले. येथील चाचा नेहरू उद्यानाचे लिज सध्याच्या तीन वर्षां ऐवजी तीस वर्षांचे करण्यासाठी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रयत्न करणार आहे. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षे आमचा खासदार निधी बंद केला आहे. तो सुरू झाल्यावर येथील सुशोभिकरणासाठी निधी देणार असल्याची घोषणा त्यांनी केली. प्राचार्य अजय कौल यांनी आतापर्यंत केलेले समाजकार्य तसेच कोविड योद्धा म्हणून निस्वार्थी भावनेने केलेले कार्य हे कौतुकास्पद असून पद्मश्री पुरस्कारासाठी त्यांची शिफारस केल्याचे कीर्तिकर यांनी सांगितले.

एकाच ठिकाणी विविध खेळांचे प्रशिक्षण येथे मिळणार असून त्यांचा होतकरू खेळाडूंनी लाभ घ्यावा असे आवाहन रमेश पोवार यांनी केले. यावेळी ईशिका तावडे  ,एल्ड्रिन नरोन्हा ,तेजस्वा निंबाळकर या निपुण्य मिळणाऱ्या खेळाडूंचा तसेच चिल्ड्रन वेल्फेअर सेंटर हायस्कूलचे ऍक्टिव्हिटी चेअरमन प्रशांत काशीद यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. येथील नागरिक व महिला तसेच विद्यार्थी उपस्थित होते. 

टॅग्स :मुंबईशिक्षण