नवीन दिवाबत्तीचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:06 AM2021-06-30T04:06:18+5:302021-06-30T04:06:18+5:30
मुंबई : प्रभाग क्रमांक ५२ मध्ये मोहन गोखले मार्ग व रंगनाथ होसिंग मार्ग या मार्गांवर दिवाबत्तीची अनेक वर्षांपासूनची नागरिकांची ...
मुंबई : प्रभाग क्रमांक ५२ मध्ये मोहन गोखले मार्ग व रंगनाथ होसिंग मार्ग या मार्गांवर दिवाबत्तीची अनेक वर्षांपासूनची नागरिकांची मागणी होती. या परिसरात अंधारामुळे नागरिकांची गैरसोय होत होती. ही समस्या लक्षात आल्यानंतर नगरसेविका प्रीती सातम यांनी महापालिका प्रशासन व अदानी इलेक्ट्रिसिटी याच्याकडे पाठपुरावा केला. त्यानुसार, या रस्त्यांवर नवीन दिवाबत्ती खांब बसविण्यात आले असून, येथील परिसर आता प्रकाशमय झाला आहे. त्याचे लोकार्पण नगरसेविका सातम यांच्या हस्ते करण्यात आले. साईबाबा कॉम्प्लेक्स, कॉनवूड, धीरज व्हॅली, दूरदर्शन या सोसायट्यांमधील रहिवासी आणि पदाधिकारी यांनी आनंद व्यक्त केला.
....
सेवानिवृत्त पोलिसांची घरे
मुंबई : वरळी, शिवडी, नायगाव आणि डिलाइल रोड येथे राहणाऱ्या सेवानिवृत्त पोलिसांना सरकारी घरे रिकामी करण्याच्या नोटिसा पोलीस खात्याने दिल्या आहेत. कोरोना काळात घरे रिकामी करण्याच्या नोटिसा दिल्याने सेवानिवृत्त पोलिस आणि त्यांचे कुटुंब हवालदिल झाले आहेत.
या प्रकरणी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून सेवानिवृत्त पोलिसांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी बोरीवलीचे आमदार सुनील राणे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. आपण मुख्यमंत्री असताना, सेवानिवृत्त पोलिसांच्या घरांबाबत सहानुभूतीने निर्णय घेतला, तसेच न्यायालयात शपथपत्र सादर करून, त्यांची घरे रिकामी करण्यास स्थगिती दिली होती, अशी आठवण फडणवीस यांनी सांगितली.
....
....
झोपडपट्टीधारकांचे मोफत लसीकरण
मुंबई : एकीकडे डेल्टा प्लस या नवीन व्हायरसचा धोका आणि येणारी तिसरी लाट लक्षात घेता, लसीकरण हा जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. अंधेरी पश्चिमचे अमित साटम यांच्या पुढाकाराने नुकतेच २,००० झोपडपट्टीवासीयांचे मोफत लसीकरण करण्यात आले, तर आतापर्यंत येथील विविध गृहनिर्माण सोसायट्यांमधील १५ हजार नागरिकांचे मोफत लसीकरण केल्याची माहिती साटम यांनी दिली. जुहू येथील विद्यानिधी शाळेत विनामूल्य खासगी लसीकरण शिबिर आयोजित केले होते. जेजेसी, जुहू बीच आणि जेआयओ, जुहू-सांताक्रुझ यांनी लसीकरणासाठी मदत केली.
....
जोगेश्वरीत अन्नधान्य वाटप
मुंबई : शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने जोगेश्वरीत दोन दिवसीय अन्नधान्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नगरसेवक प्रवीण शिंदे यांच्या माध्यमातून प्रभागातील २०० रिक्षाचालकांना धान्यवाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार रवींद्र वायकर यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार सुनील प्रभू, विधानसभा संघटक विश्वनाथ सावंत, नगरसेविका साधना माने व विधानसभा संघटक शालिनी सावंत यांच्या हस्ते अन्नधान्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता खासदार गजानन कीर्तिकर यांच्या उपस्थितीत झाली.
...
...
मढ कोळीवाड्यात धान्यवाटप
मुंबई : तौक्ते वादळात मढ कोळीवाड्याचे मोठे नुकसान झाले. येथील २३१ कोळी महिला व वादळग्रस्तांना १५ किलो धान्यवाटप भूमिपुत्र फाउंडेशन आणि ‘खाना चाहिये’ यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच करण्यात आले. यावेळेस भूमिपुत्र फाउंडेशनचे अध्यक्ष विकास मोतीराम कोळी, काशीराम भानजी, पुरुषोत्तम भगत, नागेश भोकाचा हे उपस्थित होते. मढ हरबादेवी ग्रामदेवी ट्रस्ट येथील गरबा मैदानावर हे धान्याचे वाटप झाले. कोरोना नियमांचे पालन करून आणि सामाजिक माध्यमाच्या अंतराचे पालन करून हा उपक्रम पार पाडला, असे संस्थेच्या खजिनदार दमयंती टपके यांनी सांगितले. ‘खाना चाहिये’ संस्थेचे पार्थसारथी शुक्ला, आनंद मसरानी आदी यावेळी उपस्थित होते.
....