१ मे, २०२१ पर्यंत वाहतूक सुरू करण्याचा नियोजन
मुंबई : सुपरफास्ट मुंबई – नागपूर प्रवासासाठी उभारल्या जाणा-या समृध्दी महामार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. या ७०१ किमी मार्गापैकी नागपूर ते शिर्डी या सुमारे ५२० किमी मार्गावरील प्रवास १ मे, २०२१ पासून सुरू होणार आहे. शिर्डी ते इगतपूरी हा सुमारे ९० किमीचा टप्पा डिसेंबर, २०२१ पर्यंत तर उर्वरित मार्ग मे, २०२२ पर्यंत वाहतूकीसाठी खुला होईल अशी माहिती एमएसआरडीसीच्यावतीने देण्यात आली आहे.
एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी गुरूवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत या महत्वाकांक्षी मार्गाच्या प्रगतीची सविस्तर माहिती दिली. उप व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे, चंद्रकांत पुलकुंडवार आणि अनिल गायकवाड यावेळी उपस्थित होते. या मार्गाचे १५२ किमी लांबीचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. कोरोनापूर्व काळात या कामांसाठी १८ हजार मजूर राबत होते. मजूरांना घरवापसीची परवानगी दिल्यानंतर ती संख्या १० हजारांपर्यंत कमी झाली होती. मात्र, आता त्या मजूरांची संख्या २० हजारांवर झेपावली आहे. काम जून, २०२२ पर्यंत पूर्ण करण्याची हमी या प्रकल्पासाठी वित्त पुरवठा करणा-या बँकांना दिलेली आहे. त्या मुदतीपूर्वीच काम होणार असल्याने ठेकेदारांना वाढीव रक्कम अदा करण्याचा प्रश्न उद्भवणार नाही असेही मोपलवार यांनी सांगितले. वाहने १५० किमी प्रती तास या धावतील अशी या रस्त्याची रचना केली असली तरी तिथे १२० किमीचे बंधन असेल असेही त्यांनी स्पष्ट केले.
९ टाऊनशीपचे काम प्रगतीपथावर : या मार्गावर १९ पैकी ८ ठिकाणच्या टाऊनशीपचे विकास आराखडे तयार झाले असून त्यासाठी आवश्यक असलेले भूसंपादनही झाली आहे. तिथे रस्ते., पाणी, वीज पुरवठा , सरकारी कार्यालयांसाठी जागा आणि जमीन वाटपाचे काम सुरू आहे. जून, २०२१ पर्यंत ही कामे पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे. प्रत्येक टाऊनशीपमध्ये एक लाख लोकसंख्या सामावून घेण्याचे नियोजन असले तरी ते पुढील २० वर्षांपर्यंतचे उद्दिष्ट असल्याचे मोपलवार यांनी स्पष्ट केले.