गिरणी कामगार संस्थेच्या प्रयत्नांना यश
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आठ इमारतींचे एकत्र मानीव अभिहस्तांतरण (डीम्ड कन्व्हेयन्स) करण्यात दहिसरमधील राष्ट्रीय मजदूर आनंद नगर कॉ.ऑप. हौसिंग सोसायटी असोसिएशन लिमिटेड या गिरणी कामगारांच्या संस्थेला यश मिळाले आहे. गेल्या ४० वर्षांपासून त्यांनी यासाठी जिद्द व चिकाटीने प्रयत्न केले असून त्यामुळे स्थानिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
मानीव अभिहस्तांतरण (डीम्ड कन्व्हेयन्स) प्रक्रिया ही किचकट आणि खर्चिक आहे. तसेच एका लेआऊटवर असलेल्या वेगवेगळ्या इमारतींना वेगळे अभिहस्तांतरण करावे लागत असून त्यासाठी प्रत्येक खोली अथवा फ्लॅटमागे १० ते २० हजार रुपयांचा खर्च येत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र दहिसरमधील राष्ट्रीय मजदूर आनंद नगर कॉ. ऑप. हौसिंग सोसायटी अससोसिएशन लिमिटेड या गिरणी कामगारांच्या संस्थेने जिद्दीने व चिकाटीने प्रत्येक आव्हानांना समर्थपणे तोंड दिले. परिणामी एकाच लेआऊटवर असलेल्या ८ इमारतींची एकत्र मानीव अभिहस्तांतारणाची प्रक्रिया पूर्ण झाली. यासाठी वेळोवेळी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार मनीषा चौधरी, नगरसेवक जगदीश ओझा, वृषाली बागवे, ॲडव्होकेट नम्रता नितीन सावंत यांचे मार्गदर्शन असोसिएशनला लाभले. अध्यक्ष किरण अडवणकर, सचिव नितीन सावंत तसेच अन्य पदाधिकाऱ्यांनी मनीषा चौधरींचे विशेष आभार मानले.