‘डीप क्लिनिंग ड्राइव्ह’चा विस्तार राज्यभर करणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 09:31 AM2023-12-18T09:31:52+5:302023-12-18T09:32:54+5:30

मुंबईतील वातावरणीय प्रदूषण कमी होण्यामागे ‘डीप क्लिनिंग ड्राइव्ह’चा मोठा प्रभाव आहे.

Deep cleaning drive will be extended across the state says cm eknath shinde in mumbai | ‘डीप क्लिनिंग ड्राइव्ह’चा विस्तार राज्यभर करणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘डीप क्लिनिंग ड्राइव्ह’चा विस्तार राज्यभर करणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई :मुंबईतील वातावरणीय प्रदूषण कमी होण्यामागे ‘डीप क्लिनिंग ड्राइव्ह’चा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे या मोहिमेचा सकारात्मक परिणाम पाहता त्याचा राज्यभर विस्तार केला जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. स्वच्छता मोहिमेअंतर्गत पालिकेने दर आठवड्यात एक दिवस प्रत्येक परिमंडळातील एका प्रशासकीय विभागात संपूर्ण स्वच्छता मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. 

या मोहिमेअंतर्गत रविवारी मुंबईतील पूर्व उपनगरांमध्ये होत असलेल्या कामांची पाहणी मुख्यमंत्र्यांनी सकाळी नऊ ते दुपारी १२ या तीन तासांच्या दौऱ्यात ठिकठिकाणी भेट देऊन केली. यावेळी ते बोलत होते. महानगरपालिकेने सुरू केलेली डीप क्लिनिंग ड्राइव्ह ही मुंबईकरांच्या उत्तम, निरोगी आरोग्यवर्धनासाठी उपयुक्त आहे. 

केवळ मुंबई महानगरपालिका कर्मचारी किंवा महाराष्ट्र शासन एवढ्यापुरती ही स्वच्छतेची चळवळ मर्यादित नाही. मुंबईच्या धर्तीवर ही मोहीम राज्य शासनाकडून लवकरच महाराष्ट्रभर विस्तारण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले. रविवारी महानगरपालिकेच्या परिमंडळ सहामध्ये एन विभाग, परिमंडळ पाचमध्ये एम पश्चिम विभाग आणि परिमंडळ दाेनमध्ये एफ उत्तर विभागात मोहिमेत सहभाग नोंदवला.

मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी दिली भेट :

  मुख्यमंत्र्यांनी घाटकोपरच्या अमृतनगरमधील स्वच्छतेची पाहणी करतानाच जेट स्प्रेच्या साहाय्याने पाणी फवारणी करून रस्ता स्वच्छ केला. शिवाय एन विभागामध्ये कामराज नगरातदेखील भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी रस्ते स्वच्छता केली. 

   एम पश्चिम विभागात चेंबूर (पूर्व) येथे स्वत: पाइप हाती घेत जेट स्प्रेच्या साहाय्याने उद्यानासमोरील रस्ता पाण्याने धुतला. 

  वडाळा रस्त्याच्या स्वच्छतेचे संदेश झळकावणाऱ्या, स्वच्छताविषयक घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. स्वच्छता कामांची पाहणी करताना तेथेही रस्ते स्वच्छता करून, नागरिकांशी संवाद साधला.

Web Title: Deep cleaning drive will be extended across the state says cm eknath shinde in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.