नवी मुंबई - ऐरोलीचे भाजपचे आमदार गणेश नाईक यांच्यावर असलेल्या कथित बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीनावर अद्यापही सुनावणी न झाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दुसरीकडे गणेश नाईक यांच्यावर बलात्कार आणि बंदुकीचा धाक दाखवून धमकी दिल्याची फिर्याद दिलेल्या दिपा चव्हाण राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. लवकरच त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
भाजपा नेते तथा ऐरोली विधानसभा आमदार गणेश नाईक यांच्यावर मागील काही महिन्यांपासुन बलात्काराचे आरोप लावणाऱ्या दीपा चव्हाण यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भेट घेतली. मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आधीपासूनच आवडत असून यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रिय होऊन नवी मुंबईतील जनतेची सेवा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नाईक यांच्यासोबत गेली २७ वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या नवी मुंबईतील महिलेने नाईकांविरुद्ध रिव्हॉल्व्हरने धमकावल्याची तसेच बलात्काराची तक्रार दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये दाखल केली आहे. त्यातील रिव्हॉल्व्हरने धमकावल्या प्रकरणाची सुनावणी तपास अधिकारी आणि सरकारी वकील यांचा जबाब जाणून घेतल्यानंतरच करणार असल्याचे न्या. गुप्ता यांनी स्पष्ट केले. त्यानंतर बलात्कारावरील आरोपाबाबतही अटकपूर्व जामिन ठेवण्यात आला आहे. मात्र, अद्याप त्यावरील सुनावणी पूर्ण झाली नाही.