Join us

दीपक चव्हाणांचा मुक्काम हलेना !

By admin | Published: June 30, 2015 3:00 AM

ठाणे महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेल्या आणि शिळ दुर्घटनाप्रकरणी निलंबित झालेले दीपक चव्हाण यांनी मागील दोन वर्षांपासून पालिकेच्या घराचा ताबा सोडलेला नाही.

घोडबंदर : ठाणे महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेल्या आणि शिळ दुर्घटनाप्रकरणी निलंबित झालेले दीपक चव्हाण यांनी मागील दोन वर्षांपासून पालिकेच्या घराचा ताबा सोडलेला नाही. या घराच्या मेंटेनन्सचा खर्च पालिका करीत असून, ते खाली करण्यासाठी पाच नोटिसा देऊन त्यांनी भीक न घातल्याने अखेर पोलिसांची मदत घेण्याचा विचार पालिकेने सुरू केला असल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे. या अधिकाऱ्यासह साहाय्यक आयुक्त दर्जाचे अधिकारी असलेल्या स्वाती देशपांडे यांच्या बदलीनंतर त्यांनीदेखील घर खाली केलेले नाही.ठाणे महापालिकेत साहाय्यक आयुक्त, उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त दर्जाच्या अधिकऱ्यांना राहण्यासाठी घरांची व्यवस्था पालिकेला करावी लागते. त्या घरांवर लाखोंचा खर्च करून मेंटेनन्सदेखील भरावा लागतो. नव्याने रुजू झालेल्या उपायुक्त मुख्यालय संजय निपाणे, ओमप्रकाश दिवटे, संजय हेरवाडे यांना राहण्यास घरे उपलब्ध करून द्यायची असल्याने जे अधिकारी पालिकेतून बदली झालेत त्यांना घरे खाली करण्याचा नोटीसा बजावल्या आहेत. मात्र सहाय्यक आयुक्त म्हणून प्रतिनियुक्तीवर आलेल्या स्वाती देशपांडे यांची मुरु ड जंजिरा येथे बदली होऊन वर्ष झाले तरी त्यांनी मुक्काम ठाण्यातून हलवलेला नाही.तर शीळ येथील लकी कम्पाऊड दुर्घटनेला जबाबदार धरलेल्या तत्कालीन उपायुक्त दीपक चव्हाण हे शासकीय सेवेतून ७ एप्रिल २०१३ निलंबित झाले तरी त्यांनी अद्याप सदनिका खाली केलेली नाही. शिवाईनगरमधील रवी इस्टेट आय विंग इमारतीतील चार सदनिका पालिकेच्या असून त्यातील १०४ क्र मांकाच्या खोलीत त्यांचे वास्तव्य आहे. १०२ सदनिकेत देशपांडे राहत आहेत. १०१ मध्ये तानाजी होळकर आणि १०३ क्र मांकाच्या घरात सहायक आयुक्त शंकर पाटोळे हे राहत आहेत. या दोन्ही सदनिका खाली करून नवीन अधिकाऱ्यांना घरे द्यायची आहेत. या चारही सदनिकांचा २०१४ मधील ९० हजार ९८६ रु पयांचा आणि २०१५ चा ८९ हजार ८१२ रु पयांचा मेंटेनन्स पालिकेने भरला आहे. पालिकेने दिलेल्या घरांचा ताबा कर्मचाऱ्यांनी सोडला नाही तर प्रशासन त्यांना बळजबरीने घर खाली करून घेते. दुसरीकडे या अधिकाऱ्यांना मात्र वेगळा न्याय देत असल्याची टीका होत आहे.शिळ येथील लकी कम्पाउंड दुर्घटनेला जबाबदार धरलेल्या तत्कालीन उपायुक्त दीपक चव्हाण हे शासकीय सेवेतून ७ एप्रिल २०१३ निलंबित झाले. तरी त्यांनी अद्याप पालिकेने दिलेली सदनिका खाली केलेली नाही. १८ जुलै २०१३ पासून पाच नोटिसा त्यांना देण्यात आलेल्या आहेत.