Join us

Deepak Kesarkar: 42 पैकी 18 च मंत्री झाले, दिपक केसरकरांनी सांगितलं 19 व्या मंत्र्याचं नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 8:52 AM

पहिल्या टप्प्यात कोकणातून दोन मंत्री झाले आहेत, मी (दीपक केसरकर) आणि उदय सामंत.

मुंबई - सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे तिसऱ्यांदा प्रतिनिधित्व करत असलेले आमदार दीपक केसरकर हे दुसऱ्यांदा मंत्रीपदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदेंच्या बंडात आघाडीवर असलेले नेते म्हणून केसरकर यांना पहिल्याच टप्प्यात मंत्रीपद देण्यात आले. शिवाय त्यांनी प्रवक्ते म्हणून शिंदे गटाची बाजूही सातत्याने मजबुतीने मांडली. आता, मंत्रीमंडळ विस्तारानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे सरकारवर टीका करण्यात येत असताना त्यांनी पुन्हा एकदा भूमिका मांडली आहे. तसेच, 19 व्या मंत्र्याचे नावही जाहीर केले. 

पहिल्या टप्प्यात कोकणातून दोन मंत्री झाले आहेत, मी (दीपक केसरकर) आणि उदय सामंत. त्यामुळे भरत गोगावले यांना दुसऱ्या टप्प्यात संधी मिळेल असं वाटतंय, त्यांचं नाव न आल्याने मलाही वाईट वाटलं. शेवटी मंत्रिमंडळात कोणाला स्थान द्यायचं, हा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांचा अधिकार असतो, एखादी सीट वाढवली असती तर आजच ते अॅडजस्ट झाले असते, असं केसरकर यांनी म्हटलं आहे. तसेच, पावसाळी अधिवेशनानंतर सप्टेंबर महिन्यात मंत्रिमंडळाचा पुढील विस्तार होईल, असेही त्यांनी सांगितले. 

मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाकडून संजय शिरसाट, बच्चू कडू, राजेंद्र येड्रावकर यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. त्यामुळे, शिंदे गटात काहीही नाराजी असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे संजय शिरसाट आणि एकनाथ शिंदे यांच्यात खडाजंगी झाल्याचेही वृत्त होते. तर, संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांना मंत्रीपद दिल्याने विरोधकांनी जोरदार टिका सुरू केली आहे. यासंदर्भात बोलताना दिपक केसरकर यांनी आमदारांध्ये कुठलीही नाराजी नसल्याचे म्हटले. तसेच, पावसाळी अधिवेशनानंतर सप्टेंबर महिन्यात पुढील मंत्रीमंडळ विस्तार होईल. त्यात भरत गोगावले यांना मंत्रीपद मिळेल असं वाटतंय. तूर्तास ४२ पैकी १८ मंत्र्यांचाच शपथविधी झालाय, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

रोटरी क्लबचे अध्यक्ष ते दुसऱ्यांदा मंत्री

केसरकर यांच्या कारकिर्दीची सुरुवात सावंतवाडी रोटरी क्लबच्या अध्यक्षपदापासून झाली ते योगायोगानेच राजकारणात आले आणि ते 1992 93 च्या दरम्यान काँग्रेसचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष झाले. नंतर मात्र त्यांनी कधीही मागे वळून पहिले नाही सावंतवाडीचे नगराध्यक्षनंतर  राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशी वेगवेगळी पदे भूषवत असताना 2009  मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून केसरकर पहिल्यांदा आमदार झाले.

टॅग्स :दीपक केसरकर मंत्रीशिवसेनाएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीस