मुंबई - सत्तासंघर्षाच्या लढाईत अग्रेसर असलेले शिंदे गटाचे नेते आणि उद्धव ठाकरेंना पहिलं पत्र लिहून नाराजी कळवणारे संजय शिरसाट हे नाराज असल्याच्या चर्चा मंत्रिमंडळ विस्तारानंतर रंगल्या आहेत. औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) जय महाराष्ट्र केला आणि एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) गटाचा झेंडा खांद्यावर घेतला. मात्र रात्री शिरसाट यांनी एक ट्वीट( Sanjay Shirsat Tweet) करुन सर्वांनाच धक्का दिला होता. या ट्विटची वादळी चर्चा सुरु होताच त्यांनी एका वृत्तवाहिनीशी फोनवरुन संपर्क साधत खुलासा केला आहे.
संजय शिरसाट यांच्या ट्विटबद्दल शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री दिपक केसरकर यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, एखादं ट्विट केल्यावर त्यात काही चूक वाटत असेल तर आपण ते डिलीट करतोच. त्यामुळे, त्यात वावगं नाही. पण, संजय शिरसाट यांना लवकरच मंत्रीपद मिळणार आहे, हे ओपन सिक्रेट आहे, असे स्पष्टीकरण केसरकर यांनी दिले आहे. म्हणजे यापूर्वी भरत गोगावले आणि आता संजय शिरसाट या दोन नेत्यांना मंत्रिपद देण्यात येणार असल्याचं अधिवेशनापूर्वीच केसरकर यांनी जाहीर केल्याचं दिसून येत आहे.
संजय शिरसाट यांनी टि्वट करत कुटुंब प्रमुख उद्धव साहेब ठाकरे असं म्हटलं होतं. त्यासोबतच, विधानसभेतलं उद्धव ठाकरेंचं एक भाषण देखील जोडलं होतं. पण, काही वेळातचं त्यांनी हे ट्वीट डिलीट देखील केलं आहे. तसेच, आपण नाराज असून शिंदे गटात आम्ही सर्वजण खूप खुश आहोत, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली. दरम्यान, मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंचं भाषण ट्वीट करत शिंदे गटाला इशारा तर दिला नाही ना अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
म्हणून तसं ट्विट केलं
मी जे ट्विट केलं होतं, ते उद्धव ठाकरेंनी विधानसभेत भाषण केलं होतं. त्या भाषणात त्यांनी महाराष्ट्राबद्दलचं आपलं मत व्यक्त केलं होतं. ते व्यक्त करताना कुटुंब प्रमुखाची भूमिका ते बजावत होते. त्यामुळे, आजही माझं मत आहे की, तुम्ही कुटुंब प्रमुखाची भूमिका बजावत असाल तर कुठेतरी कुटुंबातील व्यक्तींच मत लक्षात घ्यायला हवं. तुमचं मत काय आहे, यापेक्षा तुमच्या कुटुंबाचं मत काय आहे याला मान दिला पाहिजे, हा त्या मागचा अर्थ होता, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. तसेच, आपण एकनाथ शिंदेंसोबतच असून कुठलीही नाराजी नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मी नाराज नाही, आजही भूमिका कायम
आम्ही उद्धव ठाकरेंना कुटुंबप्रमुखच मानत होतो, पण त्यांनी ऐकलं नाही. त्यामुळे, आजची जी परिस्थिती आहे, त्याचा आम्हालाही खेद वाटतो. नाही, मंत्रीपद मिळालं नसल्याने मी हे ट्विट केलं नाही. मी तत्वाने वागणारा माणूस आहे. आजपर्यंतच्या शिंदेगटासोबतच्या प्रवासात मी कायमच स्पष्टपणे बोलणारा राहिलो आहे. मला जे योग्य वाटतं, ते बोलतो. उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाऊ नये हीच माझी भूमिका होती आणि आजही त्यावर मी कायम आहे. आम्ही सर्वजण खूश आहोत, अशा शब्दात शिरसाट यांनी आपली भूमिका टीव्ही 9 शी बोलताना स्पष्ट केली आहे.