Join us

Deepali Chavan Suicide Case: दीपाली चव्हाण अन् शिवकुमार यांची ऑडिओ क्लिप व्हायरल; तिच्याशी अत्यंत उर्मट भाषेत संवाद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 1:59 PM

Deepali Chavan Suicide Case: विनोद शिवकुमार आपल्याच वनविभागाच्या महिला अधिकाऱ्यांसोबत कसे एकेरी भाषेत बोलतात ते स्पष्ट होत आहे.

मुंबई: अमरावती जिल्ह्यात असलेल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल राष्ट्रीय उद्यान अंतर्गत येणाऱ्या हरीसाल वन परीश्रेत्रात कार्यरत आरएफओ दीपाली चव्हाण (deepali chavan suicide case) या तरुण महिला अधिकाऱ्याने शासकीय निवासस्थानी गोळी झाडून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. वरिष्ठ वनअधिकाऱ्यांच्या मानसिक त्रासामुळे दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केल्याची चर्चा होत आहे. याचपार्श्वभूमीवर उप वन संरक्षक विनोद शिवकुमारला नागपूर रेल्वे स्थानकावर अटक करण्यात आली आहे. आज विनोद शिवकुमार यांना धारणी पोलिसांनी न्यायालयात आणलं गेलं. यावेळी न्यायालयाच्या बाहेर वनविभागातील महिला कर्मचाऱ्यांची शिवकुमार यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. 

दीपाली चव्हाण या २८ वर्षीय तरुण अधिकाऱ्याने शासकीय निवासस्थानात गोळी झाडून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मेळघाटसारख्या दुर्गम परिसरात सेवा बजावत आणि आपल्या कामाची छाप सोडणाऱ्या दीपाली चव्हाण या गर्भवती असताना त्यांना त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मानसिक व शारीरिक छळ करून त्यांची मुस्कटदाबी केली. त्यांनी कच्या रस्त्यावरून पायी फिरण्याची, सुट्टी न देण्याची, वेतन रोखून धरण्याची शिक्षा दिली होती. एका गर्भवती महिला अधिकाऱ्याचा अशाप्रकारे छळ करून आत्महत्येस प्रवृत्त करणारी ही घटना महाराष्ट्र राज्याच्या वनखात्याला आणि एकूणच प्रशासकीय व्यवस्थेला काळिमा फासणारी असल्याचे पत्रात नमूद आहे.

दीपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात अनेक धक्कादायक आरोप केले आहे. याचदरम्यान आता दीपाली चव्हाण आणि उप वन संरक्षक विनोद शिवकुमार यांच्यामध्ये फोन वरून जो वार्तालाप झाला त्याची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये शिवकुमार आपल्याच वनविभागाच्या महिला अधिकाऱ्यांसोबत कसे एकेरी भाषेत बोलतात ते स्पष्ट होत आहे. शिवाय या क्लिपमध्ये शिवकुमार हे बोलताना मान मर्यादा आणि महिलांशी कसं बोलायचं याचं सुद्धा भान नसल्याचे दिसून येत आहे. 

दीपाली चव्हाण या महिला अधिकाऱ्यांनी जे सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे, त्याचं संपूर्ण संभाषण या ऑडिओ क्लिप मध्ये आहे. शिवाय या क्लिपमध्ये दोघांच्या संवादात खासदार नवनीत राणा, आमदार रवि राणा यांचा देखील उल्लेख आहे. संपूर्ण संभाषणादरम्यान दीपाली चव्हाण या अत्यंत नम्र भाषेत बोलताना दिसत आहेत  तर शिवकुमार मात्र अत्यंत उर्मट भाषेत बोलत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

अटक केलेल्या उपवनसंरक्षकाला तातडीने सेवेतून निलंबित करावे- प्रवीण दरेकर

अटक केलेल्या उपवनसंरक्षकाला तातडीने सेवेतून निलंबित करावे, संबंधित क्षेत्र संचालक व अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक रेड्डी यांनाही अटक करून त्यांना निलंबित करावे. या प्रकरणात आयपीएस दर्जाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन करून तातडीने गुन्ह्याचा तपास करावा, अशी मागणी पत्राद्वारे शासनाकडे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

दीपाली चव्हाण यांनी नेमकं काय म्हटलं आहे पत्रात-

ऑक्टोबर २०२०मध्ये आपण आमझरी दौऱ्यावर असताना प्रेग्नंसीमुळे मी ट्रेक करु शकत नव्हते. याबाबत मी पियूषा मॅडमला सांगितले आणि घरी निघून गेले. पण यानंतर सलग तीन दिवस मला भाकूरमध्ये कच्च्या रस्त्यातून फिरवण्यात आले. त्यामुळे माझा गर्भपात झाला. पण त्यातसुद्धा मला सुट्टी दिली नाही. माझे सासर अमरावतीत आहे. पण महिन्यातून एकदाही मला घरी जाता येत नाही. रात्री बेरात्री कुठेही भेटायला बोलवतात. अश्लील भाषेत बोलतात. मी याआधीही तुमच्याकडे तक्रार केली होती. पण तुम्ही तुमच्या अधिकाऱ्याची बाजू घेणार हे मला माहिती होती. त्यामुळे मी माझ्याच बदलीचा विचार करत होते. मेळघाट ही अशी दलदल आहे जिथे आम्ही आमच्या मर्जीने येऊ तर शकतो पण तुमच्या मर्जीशिवाय बाहेर जाऊ शक नाही. याच दलदलीत मी अडकत चालले आहे.

माझ्या रेंजमधील सर्व काम करुनही मला अद्याप याचे पैसे मिळाले नाहीत. मी मेडिकलवरुन कामावर रुजू होत नव्हते पण तुमच्यामुळे रुजू झाले. त्यावेळी तुम्ही त्यांच्याशी बोलाल असे आश्वासन दिले होते. पण त्यांच्या वागण्यात काहीही बदल झाला नाही. उलट दिवसेंदिवस त्यांचा माझ्यावरचा राग वाढत चालला असल्याचे दीपाली चव्हाण यांनी पत्रात म्हटले होते. माझ्या स्टाफसमोर, गावकऱ्यांसमोर आणि मजूरांसमोर ते मला शिवीगाळ करतात. ते मला सहन होत नाही. त्यामुळे मी हे सांगत आहे. कित्येक वेळा रात्री त्यांनी मला बोलवले. माझ्या एकटेपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या मर्जीने न वागल्याची शिवकुमार सर मला शिक्षा देत आहेत. मला माहिती आहे, इतकं लिहूनही तुम्ही त्यांचं काहीही बिघडवू शकणार नाही.

टॅग्स :दीपाली चव्हाणपोलिसवनविभागमहाराष्ट्रअमरावतीनागपूर