मुंबई: अमरावती जिल्ह्यात असलेल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल राष्ट्रीय उद्यान अंतर्गत येणाऱ्या हरीसाल वन परीश्रेत्रात कार्यरत आरएफओ दीपाली चव्हाण (deepali chavan suicide case) या तरुण महिला अधिकाऱ्याने शासकीय निवासस्थानी गोळी झाडून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. वरिष्ठ वनअधिकाऱ्यांच्या मानसिक त्रासामुळे दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केल्याची चर्चा होत आहे. याचपार्श्वभूमीवर दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.
दीपाली चव्हाण या २८ वर्षीय तरुण अधिकाऱ्याने शासकीय निवासस्थानात गोळी झाडून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मेळघाटसारख्या दुर्गम परिसरात सेवा बजावत आणि आपल्या कामाची छाप सोडणाऱ्या दीपाली चव्हाण या गर्भवती असताना त्यांना त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मानसिक व शारीरिक छळ करून त्यांची मुस्कटदाबी केली. त्यांनी कच्या रस्त्यावरून पायी फिरण्याची, सुट्टी न देण्याची, वेतन रोखून धरण्याची शिक्षा दिली होती.
एका गर्भवती महिला अधिकाऱ्याचा अशाप्रकारे छळ करून आत्महत्येस प्रवृत्त करणारी ही घटना महाराष्ट्र राज्याच्या वनखात्याला आणि एकूणच प्रशासकीय व्यवस्थेला काळिमा फासणारी असल्याचे पत्रात नमूद आहे. तसेच दीपाली चव्हाण यांनी मृत्यूपूर्वी तीन पत्रे लिहिल्याचे समोर आली असून यात त्यांनी आपल्या पतीला लिहिलेले भावनिक पत्र मन हेलावून टाकणारे आहे. पहिले पत्र वरिष्ठ अधिकारी श्रीनिवास रेड्डी यांना, दुसरे पतीला आणि तिसरे आई शंकुतला चव्हाण यांच्या नावे लिहिले आहे. ही तिन्ही पत्रे धारणी पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.
दीपाली चव्हाण यांनी पती राजेश मोहिते यांना लिहिलेले पत्र अतिशय भावनिक आहे. हे पत्र जशास तसं...
प्रिय नवरोबा,
लिहून लिहून थकले. खूप डोकं दुखत आहे. मला तुझी आठवण येत आहे. तुमच्या सोबत बोलत बोलत मी तुम्हाला पत्र लिहित आहे. माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. आता नाही म्हणू शकत जिवापेक्षा जास्त कारण आता मी जीव देत आहे.
साहेब मला काय काय बोलले ते सगळं मी तुला सांगितलं. तू मला शांत राहायला सांगतोय मी शांत राहते. पण मला सहन नाही होत. तू नेहमी म्हणतोस माझी हार्डडिस्क भरली आहे. खरंच भरली आहे. साहेबाने मला पागल करून सोडलंय. माझा इतका अपमान कधीच कोणी केला नाही जितका शिवकुमार साहेब करतात. मी खूप सहन केलं पण, आता माझी लिमिट खरंच संपली आहे. यावर उपाय असू शकतो. मी सुट्टी घेऊ शकते पण, सुट्टी देखील तो मंजूर करत नाही. तुझ्याशी बोलायला हवं होतं. मी तुझी वाट पाहत होते घरी यायची. आज आई पण गावी गेली. घरी कोणीच नाहीये. घर खायला उठत आहे. मी हे पाऊल उचलत आहे मला माफ कर. जगातला सगळ्यात चांगला नवरा तू आहेस. माझ्यावर खूप प्रेम करतोस. मला मानसिक त्रास होत आहे म्हणून तू माझ्या जवळ येऊन राहिलास. आपण रेड्डी सरांना सगळं सांगून सुद्धा त्याचं त्रास देनं कमी झालं नाही.
बाकी जाऊ दे, तू तुझी काळजी घे. तुझी म्हणजे तुझ्या पोटाची बरं. खूप व्यायाम कर नेहमीसारखा. माझ्यासारख्या आळशी नको. आईची व नितेशची काळजी घे, तूच सगळ्यांना सांभाळणार आहेस मला माफ कर. मी आपल्या बाळाला गमावलं. आपला परिवार अजून पूर्ण नव्हता झाला. मला माफ कर तुला लग्नात दिलेली सगळी वचनं अर्धवट सोडून मी जात आहे. आपल्या संसाराला नजर लागली आहे. तू तुझ्यासाठी सेटिंग करायला सुरुवात कर. माझ्या बोलण्याने मी तुला कधी दुखावलं असेल, तर मला माफ कर. तुझं लग्नाचं वय अजून गेलेलं नाही. तू पुन्हा लग्न कर, पण नोकरीवाली बायको नको करु, नाहीतर ती पण माझ्यासारखी तुला वेळ देणार नाही. मी नेहमी म्हणते तू मला सोडून नको जाऊ पण आज मी तुला सोडून जात आहे.
मला माफ कर मी आपल्या बाळाला गमावलं. मला माफ कर तुला लग्नात दिलेली सगळी वचनं अर्धवट सोडून मी जात आहे. आपल्या संसाराला नजर लागली. माझ्या बोलण्याने मी कधी तुला दुखावलं असेल तर मला माफ कर. मी नेहमी म्हणते तू मला सोडून नको जाऊ पण, आज मी तुला सोडून जात आहे. माझ्या आत्महत्येला सर्वस्वी जबाबदार विनोद शिवकुमार, उपवनसंरक्षक गुगामल वन्यजीव विभाग चिखलदरा यास धरावे. त्याच्या मानसिक त्रासाला कंटाळून मी जीव देत आहे. आपला संसार अपूर्ण राहिला. पुढच्या जन्मी आपण नव्याने सुरुवात करू. माझ्यासाठी तू सगळं काही केलंस मीच कमी पडत आहे. माझी हार्डडिस्क फुटत आहे. त्यामुळे मी हा निर्णय घेत आहे. मला माफ कर. माझ्या मृत्यूला सर्वस्वी जबाबदार शिवकुमार आहे...
- दीपाली...
उपवनसंरक्षकाकडून दबाव?
दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येला दोघेही जबाबदार आहेत. त्यामुळे कुठल्याच दबावाला बळी पडू नका तथा आपल्या एका बहिणीच्या मारेकऱ्यासाठी गद्दारी करू नका, असा मेसेज सोशल मीडियावर वनकर्मचाऱ्यांना पाठवून जनजागृती केली जात आहे.
रेड्डी यांनी मोठ्या प्रमाणात विकासात्मक कामे केली, अशा आशयाचे पत्र वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांकडून लिहून घेतले जात असल्याची माहिती मिळाली. त्यासंदर्भात काही उपवनसंरक्षकांशी आम्ही चर्चा केली. कर्मचाऱ्यांनी निडर राहावे. दीपाली चव्हाण यांना न्याय मिळवून द्यायचा आहे.- प्रदीप बाळापुरे, अध्यक्ष, महाराष्ट्र वनरक्षक वनपाल संघटना, अमरावती.
रवि, नवनीत राणांनी घेतली आयजींची भेट
दीपाली यांच्या आत्महत्येस कारणीभूत असलेला उपवनसंरक्षक शिवकुमार याला पाठीशी घालणारे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्रसंचालक एम. एस. रेड्डी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून तातडीने अटक करावी व दीपाली चव्हाण यांच्या कुटुंबीयांना न्याय द्यावा, या मागणीसाठी खासदार नवनीत राणा व आमदार रवि राणा यांनी अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मिणा यांची शनिवारी दुपारी भेट घेतली. त्यांच्याशी या प्रकरणावर अर्धा तास चर्चा केली.