Join us

Deepali Chavan Suicide Case: दीपाली चव्हाण यांना मदत करता न आल्याने खंत; नवनीत राणा यांना अश्रू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 5:17 PM

Deepali Chavan Suicide Case: नवनीत राणा म्हणाल्या की, आपण स्वतः दीपाली चव्हाण प्रकरणात रेड्डी यांच्याकडे १० वेळा फोन केले आणि रवी राणा यांनी सुद्धा रेड्डी तसेच माजी वनमंत्री संजय राठोड यांनी त्यांच्याकडे तक्रार दाखल केली होती.

मुंबई: अमरावती जिल्ह्यात असलेल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल राष्ट्रीय उद्यान अंतर्गत येणाऱ्या हरीसाल वन परीश्रेत्रात कार्यरत आरएफओ दीपाली चव्हाण (deepali chavan suicide case) या तरुण महिला अधिकाऱ्याने शासकीय निवासस्थानी गोळी झाडून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. वरिष्ठ वनअधिकाऱ्यांच्या मानसिक त्रासामुळे दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केल्याची चर्चा होत आहे. याचपार्श्वभूमीवर दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.

दीपाली चव्हाण या २८ वर्षीय तरुण अधिकाऱ्याने शासकीय निवासस्थानात गोळी झाडून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मेळघाटसारख्या दुर्गम परिसरात सेवा बजावत आणि आपल्या कामाची छाप सोडणाऱ्या दीपाली चव्हाण या गर्भवती असताना त्यांना त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मानसिक व शारीरिक छळ करून त्यांची मुस्कटदाबी केली. त्यांनी कच्या रस्त्यावरून पायी फिरण्याची, सुट्टी न देण्याची, वेतन रोखून धरण्याची शिक्षा दिली होती. एका गर्भवती महिला अधिकाऱ्याचा अशाप्रकारे छळ करून आत्महत्येस प्रवृत्त करणारी ही घटना महाराष्ट्र राज्याच्या वनखात्याला आणि एकूणच प्रशासकीय व्यवस्थेला काळिमा फासणारी असल्याचे पत्रात नमूद आहे. दीपाली चव्हाण आत्महत्या आता राजकीय आखाडा तापू लागला आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी आपली भूमिका मांडली आहे.

Deepali Chavan Suicide Case: 'तू पुन्हा लग्न कर, पण...'; आत्महत्येपूर्वी दीपाली चव्हाण यांचं पतीला भावनिक पत्र

नवनीत राणा म्हणाल्या की, आपण स्वतः दीपाली चव्हाण प्रकरणात रेड्डी यांच्याकडे १० वेळा फोन केले आणि रवी राणा यांनी सुद्धा रेड्डी तसेच माजी वनमंत्री संजय राठोड यांनी त्यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी सुद्धा रेड्डी यांच्याकडे मागणी केली असताना रेड्डी यांनी सातत्याने डी एफ ओ शिवकुमार यांना वाचविण्याचे प्रयत्न केले त्यामुळे रेड्डी सुद्धा शिवकुमार एवढेच दोषी असल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. तसेच दीपाली चव्हाण यांना मदत करता न आल्याची खंत व्यक्त करत असताना नवनीत राणा यांनी अश्रू अनावर झाले.

तत्पूर्वी, विनोद शिवकुमार याला पाठीशी घालणारा अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्रसंचालक एम.एस. रेड्डी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून तातडीने अटक करावी व दीपाली चव्हाण यांच्या कुटुंबीयांना न्याय द्यावा, या मागणीसाठी खासदार नवनीत राणा व आमदार रवि राणा यांनी अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मिणा यांची शनिवारी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास भेट घेतली. त्यांच्याशी या प्रकरणावर अर्धा तास चर्चा केली. जिल्हाभरातून आलेले युवा स्वाभिमान संघटनेचे महिला व पुरुष पदाधिकारीसुद्धा यावेळी उपस्थित होते.

Deepali Chavan Suicide Case: दीपालीच्या आत्महत्येवळी शिवकुमार हरिसाल परिसरात होता; निवासस्थानी गेला, फ्रेश झाला अन्...

दीपाली चव्हाण यांचे प्रकरण गंभीर आहे. शिवकुमारने दीपाली चव्हाण त्यांचा नोकरीत असताना छळ केला. त्यांना मानसिक त्रास दिला. ही बाब तिने अनेकदा एम.एस. रेड्डीला सांगितली. मात्र, शिवकुमारविरुद्ध कारवाई करण्याऐवजी त्याला पाठीशी घातले. म्हणूनच त्याची हिंमत वाढली. दीपाली यांना हा प्रकार सहन न झाल्याने तिने टोकाची भूमिका घेतली. या प्रकरणात जेवढा दोषी शिवकुमार आहे, तेवढाच रेड्डीसुद्धा आहे. त्यामुळे त्याला आरोपी करून अटक करण्याची आवश्यकता असल्याचे खासदार नवनीत राणा व आमदार रवि राणा यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले. 

उपवनसंरक्षकाकडून दबाव?

दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येला दोघेही जबाबदार आहेत. त्यामुळे कुठल्याच दबावाला बळी पडू नका तथा आपल्या एका बहिणीच्या मारेकऱ्यासाठी गद्दारी करू नका, असा मेसेज सोशल मीडियावर वनकर्मचाऱ्यांना पाठवून जनजागृती केली जात आहे. रेड्डी यांनी मोठ्या प्रमाणात विकासात्मक कामे केली, अशा आशयाचे पत्र वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांकडून लिहून घेतले जात असल्याची माहिती मिळाली. त्यासंदर्भात काही उपवनसंरक्षकांशी आम्ही चर्चा केली. कर्मचाऱ्यांनी निडर राहावे. दीपाली चव्हाण यांना न्याय मिळवून द्यायचा आहे.- प्रदीप बाळापुरे, अध्यक्ष, महाराष्ट्र वनरक्षक वनपाल संघटना, अमरावती.

टॅग्स :दीपाली चव्हाणनवनीत कौर राणाअमरावतीपोलिस