सचिनचा गेमिंगवाला डीपफेक व्हिडिओ; मुंबई पोलिसांनी घेतली ॲक्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 01:19 PM2024-01-18T13:19:54+5:302024-01-18T13:22:14+5:30
सचिन तेंडलकर जगप्रसिद्ध क्रिकेटर असून अनेक कंपन्यांचा ब्रँड अॅम्बेसिडरही आहे.
भारतरत्न आणि मास्टरब्लास्टर फलंदाज सचिन तेंडुलकरच्या ( Sachin Tendulkar) नावाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. एका व्हिडिओत सचिन एका गेमिंग अॅपची ही जाहीरात करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र, तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर करून हा व्हिडीओ तयार करण्यात आला असल्याचे सचिनने स्वतः ट्विट करून याबद्दल सांगितले होते. तसेच, त्याने या अॅप विरोधात तक्रार करण्याचे आवाहन सर्वांना केले आहे. आता, सचिनच्या ट्विटची दखल घेत मुंबईपोलिसांनी अॅक्शन घेतली आहे. पोलिसांनी याप्रकरणी सायबर क्राईमअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
सचिन तेंडलकर जगप्रसिद्ध क्रिकेटर असून अनेक कंपन्यांचा ब्रँड अॅम्बेसिडरही आहे. एका क्रिकेट गेमिंग अॅपचाही तो ब्रँड अम्बेसिडर असून त्याच्या अनेक जाहिराती माध्यमांत, समाज माध्यमातून झळकतात. विशे, म्हणजे सचिनच्या या जाहिरातीविरुद्ध आमदार बच्चू कडू यांनी आवाजही उठवला होता. तसेच, सचिन तेंडुलकर हे भारतरत्न आहेत, त्यांनी अशा जुगार प्रमोशन करणाऱ्या गेम्सची जाहिरात करुन नये, अशी मागणीही त्यांनी केली होती. दरम्यान, आता सचिनचा बनावट व्हिडिओ व्हायरल झाला असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई पोलिसांनी याप्रकरणी आयपीसीच्या कलम ५०० आणि आयटी अधिनियम कलम ६६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
काय म्हणाला सचिन
''हा व्हिडिओ बनावट असून तुम्हाला फसवण्यासाठी बनवला आहे. तंत्रज्ञानाचा गैरवापर करण्याचा हा प्रकार पूर्णपणे चुकीचा आहे. आपणा सर्वांना विनंती आहे की असे व्हिडिओ किंवा अॅप्स किंवा जाहिराती दिसल्यास त्वरित कळवा,''असे ट्विट सचिनने केले आहे. तो पुढे म्हणतो,'' सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने देखील सावधगिरी बाळगली पाहिजे आणि त्यांच्याविरुद्ध केलेल्या तक्रारींवर लवकरात लवकर कारवाई करावी. चुकीची माहिती आणि बातम्यांना आळा बसावा आणि डीपफेकचा गैरवापर थांबवता यावा यासाठी त्यांची भूमिका या बाबतीत खूप महत्त्वाची आहे.'', असेही सचिनने म्हटले होते. सचिनने आपल्या ट्विटमध्ये केंद्रीयमंत्री राजीव चंद्रशेखर यांना मेन्शन केले होते.
सचिनचं क्रिकेट करिअर
दरम्यान, सचिन तेंडुलकरने २०० कसोटी सामन्यांत ५३.७८ च्या सरासरीने १५९२१ धावा केल्या आहेत आणि त्यात ५१ शतकं व ६८ अर्धशतकांचा समावेश आहे. ४६३ वन डे सामन्यांत त्याने ४९ शतकं व ९६ अर्धशतकांसह १८४२६ धावा केल्या आहेत. नाबाद २०० ही त्याची वन डेतील, तर नाबाद २४८ ही कसोटीतील सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे.