मुंबई : मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे माजी व्यवस्थापकीय संचालक समीर वानखेडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी रविवारी नवाब मलिक यांच्याविरुद्ध मानहानीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. वानखेडे यांच्या बाजूने निकाल देताना जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने ९१ पानी आदेशात वानखेडे हे मुस्लीम असल्याचा युक्तिवाद फेटाळून लावत जन्माने महार असल्याचा स्पष्ट निर्वाळा समितीने दिल्यानंतर वानखेडेनी हा पलटवार केला आहे.
गोरेगाव पोलिसांनी नोंदवलेल्या वानखेडे यांच्या जबानीत असेही नमूद करण्यात आले आहे की, वानखेडे यांच्या वडिलांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यात मलिक यांना मुंबई उच्च न्यायालयाने यावर मनाई करुनही वानखेडे कुटुंबाविरुद्ध विधान तसेच आरोप करणे मलिक यांनी सुरूच ठेवले. कारण ते (वानखेडे) शेड्यूल कास्टचे आहेत. वानखेडे यांच्या तक्रारीच्या आधारे, गोरेगाव पोलिसांनी भारतीय दंडविधान संहिता आणि ॲट्रॉसिटी कायद्याच्या विविध कलमांखाली एफआयआर नोंदवला आहे.
मलिक यांनी मला आणि माझ्या कुटुंबाला खोट्या कागदपत्रांच्या आधारे बोगस (बनावट) म्हटले, असेही वानखेडे यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. ‘वानखेडे यांच्या तक्रारीवरून, गोरेगाव पोलिसांनी भारतीय दंडविधान संहिता कलम ५००, ५०१ तसेच अनुसूचित जाती / जमाती कायद्याच्या कलम ३ (१) नुसार गुन्हा दाखल केला. वानखेडे यांना दोन दिवसांपूर्वीच मुंबई जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून क्लीनचीट मिळाली आहे.
एफआयआरमध्ये म्हटले आहे...वानखेडे यांनी गोरेगाव पोलिसांना दिलेल्या तक्रारीनंतर दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये म्हटले आहे की, जावयाला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्या कुटुंबावर खोटे आरोप केले. मलिक यांनी आर्यन खान प्रकरणाचा फायदा घेतल्याचा आरोपही वानखेडे यांनी केला. जनमानसात त्यांची प्रतिमा मलीन करण्यासाठी त्यांना अटक करून त्यांच्यावर खोटे आरोप केले.