लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी विहंग गार्डनसंदर्भात केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. आम्ही ठाण्यात कोणत्याही प्रकारची अनधिकृत इमारत बांधलेली नाही. त्यांचे आरोप चुकीचे असून मी या शहराचा लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे बांधकाम करताना अनधिकृतरीत्या केलेले नाही. सोमय्या यांनी जी काही बदनामी केलेली आहे, त्याविरोधात १०० कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.
१० वर्षांपूर्वी आम्ही विहंग गार्डन या इमारती बांधल्या. त्या बांधत असताना महापालिकेला शाळेची इमारत बांधून दिली. त्याबदल्यात टीडीआर देणे बाकी असताना आम्ही आधी ती इमारत बांधल्याने तत्कालीन आयुक्तांनी तशी नोटीस बजावली होती. परंतु, महापालिकेला जी इमारत बांधून दिलेली आहे, त्याच्या टीडीआरच्या मोबदल्यामध्ये या इमारतींचे बांधकाम केलेले आहे. हे जेव्हा त्यांच्या लक्षात आले, तेव्हा त्यांनी ती नोटीस मागे घेऊन आमच्या इमारती अधिकृत असल्याचा निर्वाळा दिला. तसे सर्टिफिकेट दिले. त्यानंतर आम्ही घरे विकली आहेत. किंबहुना त्याच इमारतीत माझे कार्यालयदेखील आहे. परंतु केवळ जाणीवपूर्वक ईडीच्या फेऱ्यात अडकलेल्या सरनाईक यांच्यावर कधी पाकिस्तानी क्रेडिट कार्ड मिळाले म्हणून तर कधी दाऊद इब्राहिमशी संबंध आहे, तर कधी इंटरनॅशनल लेव्हलच्या व्यावसायिकांबरोबर संबंध आहेत, फ्रान्सच्या काही राष्ट्रध्यक्षांबरोबर माझी पार्टनरशिप आहे, असे बिनबुडाचे आरोप मागील १० ते २० दिवसांपासून भाजपकडून सुरू आहेत. मी प्रत्येक शंकेचे निरसण ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर केलेले आहे.