- विशेष प्रतिनिधी ।मुंबई : भाजपने मनी आणि जैन मुनींच्या जोरावर मिरा भाईंदर महापालिकेची निवडणूक जिंकली, असा आरोप करणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिले. लोक आपल्याला सातत्याने का झिडकारतात, याची कारणे शोधण्याऐवजी शिवसेनेने आपल्या पराभवाचा राग एका जैन मुनींवर काढणे हा रडीचा डाव आहे, असा टोला भाजपाचे प्रदेश प्रवक्ते माधव भांडारी यांनी लगावला.पत्रपरिषदेत राऊत म्हणाले, जैन मुनींनी भाजपाचा प्रचार केला. एखाद्या धार्मिक व्यक्तीने अशाप्रकारचा प्रचार करणे म्हणजे हा आचारसंहितेचा भंग असून शिवसेना निवडणूक आयोगाकडे भाजपविरोधात तक्रार करणार आहे. भाजपचा हा विजय महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक लावणारा आहे. जामा मशिदींचे इमाम याआधी असे फतवे काढत होते. तसेच फतवे मिरा-भाईंदर निवडणुकीत जैन मुनींनी काढले. यापुढे जर कुणी मुनींनी अशाप्रकारे धार्मिक चिथावणीखोर वक्तव्य शिवसेनेसंदर्भात केले तर त्यांची गाठ शिवसेनेशी आहे, असा सज्जड दमही राऊत यांनी दिला.त्यावर, भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी शिवसेनेला प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवापासून शिवसेनेची अपयशाची मालिका चालू असून मीरा भाईंदर निवडणुकीतील शिवसेनेचा पराभव ही त्या मालिकेतीलच पुढची कडी आहे, याची कारणे शोधण्याऐवजी शिवसेनेने आपल्या पराभवाचा राग एका जैन मुनींवर काढणे हा रडीचा डाव आहे. सर्वसंगपरित्याग करून पूर्णवेळ समाजासाठी काम करणाºया मुनींवर आगपाखड करणाºया शिवसेनेला हिंदुत्वाचा वारसा सांगायचा काहीही नैतिक अधिकार नाही. नयनपद्मसागर मुनींची तूलना दहशतवादी कारवायातील आरोपी असलेल्या एका धार्मिक प्रवचनकाराशी करणे ही शिवसेनेची वैचारिक दिवाळखोरी आहे. जैन मुनींवर आगपाखड करून जनादेशाचा अपमान करण्यापेक्षा जनतेचा आदर केला तर सेनेचे राजकारणात काही तरी स्थान उरेल, असा टोला त्यांनी हाणला.माफीची मागणीखा. संजय राऊत यांनी जैन मुनींविषयी काढलेल्या अनुद्गाराबद्दल माफी मागावी आणि आपले वक्तव्य मागे घ्यावे, अशी मागणी जैन मायनॉरिटी फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी केली आहे.
पराभवाचा राग जैन मुनींवर काढणे हा तर रडीचा डाव, भाजपाचा पलटवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 5:50 AM