Join us

म्हाडाच्या लॉटरीत अत्यल्प गटाचा भ्रमनिराश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2018 6:50 PM

परवडणाऱ्या हक्काच्या घरासाठी मुंबईकर दरवर्षी म्हाडाच्या घरांच्या लॉटरीची आतुरतेने वाट पाहत असतात.

- अजय परचुरेमुंबई- परवडणाऱ्या हक्काच्या घरासाठी मुंबईकर दरवर्षी म्हाडाच्या घरांच्या लॉटरीची आतुरतेने वाट पाहत असतात. ज्याचे मुंबईत हक्काचे घर नाही अशा गोरगरीब जनतेसाठी ही लॉटरी असते, असा म्हाडाचा दरवर्षीचा दावा असतो. मात्र हा दावा प्रत्यक्षात फोल ठरला आहे. कारण मुंबई विभागाची लॉटरी जाहीर होण्यापूर्वी येणा-या लॉटरीत संपूर्ण मुंबईभरात एकूण घरांपैकी ४८० घरे अत्यल्प गटासाठी देऊ, अशी घोेषणा म्हाडाने केली होती. मात्र, लॉटरी जाहीर झाल्यावर घरे ४८० नसून फक्त ६३ असल्याचे समोर आले आहे.३ लाख ज्याचे वार्षिक उत्पन्न असते असे नागरिक म्हाडाच्या लॉटरीच्या या अत्यल्प गटात मोडतात. ज्यांचे वार्षिक उत्पन्न इतके कमी असते त्यांनाच मुंबईत निवा-यासाठी हक्काच्या घराची सर्वात जास्त गरज असते. खासगी बिल्डरकडून महागडे घर घेणे परवडत नसल्याने अत्यल्प गटातील लोक हे म्हाडाच्या परवडणा-या घरांच्या लॉटरीची जाहिरात येण्याची अगदी आतुरतेने वाट पाहत असतात. आतापर्यंतचा म्हाडाचा इतिहास असा आहे की प्रत्येक लॉटरीत अत्यल्प गटातील घरांसाठी सर्वात जास्त अर्ज भरण्यात आले आहेत. काही वेळा काही ठिकाणच्या घरांसाठी लाखोंनी अर्ज आल्याचीही उदाहरणे आहेत. मात्र इतकी मागणी असूनही म्हाडाने अत्यल्प गटांच्या घरांमध्ये वाढ करण्याविषयी नेहमीच दुर्लक्ष केले आहे, असा अर्जदारांचा नेहमीचा सूर असतो जो या वर्षीही कायम राहिला आहे. २०१७ च्या लॉटरीतही म्हाडाकडून अत्यल्प गटाला अतिशय दुय्यम स्थान देण्यात आले होते. त्या वर्षी अत्यल्प गटासाठी फक्त ८ घरांचाच लॉटरीत समावेश होता.सर्वसामान्य नागरिकांनी टीका केल्यानंतर म्हाडाने २०१८ च्या लॉटरीत अत्यल्प गटात ४८० घरांचा समावेश करू, असे आश्वासन दिले. त्यानुसार वडाळाजवळील अ‍ॅण्टॉप हिलमध्ये २७८ घरे, सायनमधील प्रतीक्षानगरमध्ये ८८ आणि मानखुर्दमधील पीएमजी कॉलनीत ११४ घरे अशी एकूण ४८० घरे उपलब्ध करून देण्याचा म्हाडाने दावा केला होता. मात्र, लॉटरी जाहीर झाल्यावर मानखुर्दमध्ये ५२, सायनमधील प्रतीक्षानगरमध्ये ५, पवईजवळील चांदिवली भागात ५ आणि बोरीवलीमधील मागाठाणे भागात १ घर अशी ६३ घरेच जाहीर झाली आहेत.म्हाडाने ४८० ऐवजी फक्त ६३ घरे लॉटरीत ठेवून सामान्यांची घोर निराशा केली आहे. म्हाडाने उरलेली ४१७ घरे अल्प गटात वळवल्याने अल्प गटासाठी लॉटरीतील घरांची संख्या ही थेट ९२६ घरांवर जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे अल्प गटासाठी जास्त संधी आणि अत्यल्प गटासाठी मात्र कमीत कमी संधी अशी अवस्था झाली आहे. कमी घरे असल्यामुळे लॉटरी लागेलच याची शाश्वती नाही, असे मत अत्यल्प गटात अर्ज करण्यासाठी उत्सुक असणाºया शाहू देवळे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.

टॅग्स :म्हाडा