'सागरा प्राण तळमळला', सावरकरांवरील वादावरून पंकजा मुंडेंचा देवेंद्रांना चिमटा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 08:47 AM2019-12-17T08:47:09+5:302019-12-17T08:48:18+5:30
पंकजा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन पुन्हा एकदा भाजपा नेत्यांनाच लक्ष्य केल्याचं दिसून येतंय
मुंबई - माजी ग्रामविकास मंत्री आणि भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील शीतयुद्ध महाराष्ट्राला परिचित आहे. 12 डिसेंबर रोजी गोपीनाथ गडावरही पंकजा यांनी देवेंद्र फडणवीसांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले. एका शायरीतून फडणवीसांन डिवचण्याचा प्रयत्न पंकजा यांनी केला होता. मात्र, माझी ती शायरी माझ्या कार्यकर्त्यांना उद्देशून होती, असेही स्पष्टीकरण पंकजा यांनी दिलं. आता, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरुन पंकजा यांनी अप्रत्यक्षपणे तोफे डागली आहे.
पंकजा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन पुन्हा एकदा भाजपा नेत्यांनाच लक्ष्य केल्याचं दिसून येतंय. नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी सभागृहात गदारोळ घातला. राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव घेऊन त्यांचा अपमान केला आहे. जोपर्यंत राहुल गांधी माफी मागत नाहीत, तोपर्यंत आमचा आवाज बंद होणार नाही, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात बोलताना म्हटले होते. फडणवीस यांच्या या कृतीचे भाजपा नेत्यांनी समर्थन केले. तर, सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर टीका केली. राज्यात इतर प्रश्न महत्त्वाचे असून त्यास प्राधान्य देणे गरजेचं असल्याचं सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी म्हटलं. आता, पंकजा मुंडेंनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरु तोच रोख व्यक्त केल्याचं दिसून येतंय.
"सागरा प्राण तळमळला" या देशात तरुणांना काय हवंय.. 1947पूर्वी स्वातंत्र्य हवं होतं, आता स्थैर्य हवं आहे. महात्म्यांचा अपमान त्यांचा उल्लेख चुकीच्या पद्धतीने केल्याने होतोच.. प्रचंड संतापही होतो, सर्वांना होतो. त्यांच्या नावाच्या राजकारणाने पीडा ही होते. कधी आपण संवेदनशील होऊन देशाच्या पुढील पिढीसाठी योगदान देणार ??? जसे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिले,'' असे ट्विट पंकजा यांनी केले आहे. पंकजा यांच्या या ट्विटचा रोख भाजपा नेत्यांनी विधानसभेत केलेल्या गदारोळाकडेच आहे. त्यामुळे राज्यातली तरुणांच्या प्रश्नाची कास धरत पुन्हा एकदा पंकजा यांनी फडणवीसांनाच लक्ष्य केलंय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
कधी आपण संवेदनशील होऊन देशाच्या पुढील पिढीसाठी योगदान देणार ???..जसे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिले .. #Savarkar
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) December 16, 2019
दरम्यान, जलयुक्त शिवार योजना मी खूपच आधीच राबवली होती, असे म्हणत पंकजा यांनी यापूर्वीही फडणवीसांना टोला लगावला होता. तसेच, मी पक्षावर नाराज नाही, याचाही त्यांनी पुनरुच्चार केला होता. मी काही दिवसांपूर्वी फेसबुकवर पोस्ट लिहिली, त्यामागे कोणतीही अस्वस्थता नव्हती. मी नाराज नव्हते, अस्वस्थ नव्हते. पण, फेसबुक पोस्ट लिहिल्यानंतर 1 डिसेंबर ते 12 डिसेंबर या कालावधीत ज्या वावड्या उठल्या त्यामुळे मी अस्वस्थ झाले, असं त्यांनी म्हटले होते.