संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात हरणांच्या संख्येत घट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 02:28 AM2018-05-04T02:28:33+5:302018-05-04T02:28:33+5:30
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाने बुद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित केलेल्या वन्यजीव गणना मोहिमेत धक्कादायक माहिती समोर आली आहे. गे
मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाने बुद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित केलेल्या वन्यजीव गणना मोहिमेत धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बिबट्यांची संख्या वाढली असून हरणांची संख्या कमी झाली आहे. गेल्या वर्षी उशिरा सुरू झालेल्या पावसाने यंदा पाणवठे आटले असून, त्यामुळेच हरणे या ठिकाणाहून दूर गेल्याने संख्येत घट दिसत असल्याची प्रतिक्रिया उद्यानाचे साहाय्यक वनसंरक्षक मोहन नाईकवाडी यांनी व्यक्त केली आहे.
नाईकवाडी म्हणाले की, पाणवठे लवकर आटल्याने हिरवळ कमी झाली आहे. त्यामुळे बरीच हरणे दूर गेल्याची शक्यता आहे. परिणामी, गणनेदरम्यान कॅमेरा ट्रॅपिंगमध्ये हरणे दिसून आली नाहीत. या वेळी चार वनपरिक्षेत्रात ४३ मचाण बांधली होती. या वन्यजीव गणनेत १० बिबटे निदर्शनास आल्याचे वनविभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यात १० बिबटे, २७ सांबर, २९५ चितळ, ३ भेकर, १११ माकड, ९७ लंगुर, ६० वटवाघुळ, १४ रानडुक्कर, १५ रान कोंबडे, १८ मुंगुस, ६ रान मांजर, ६ घुबड, ३ ससे, ५ मोर आणि १ सर्प आढळून आले. गेल्या वर्षी बिबट्यांची संख्या ७ होती, तर या वर्षी १० झालेली आहे. प्राणिमित्रांच्या मते, ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे, तेथे प्राण्यांची संख्या जास्त असते. म्हणूनच हरणांची संख्या यंदा १०० हून कमीची नोंद झाली आहे. '
मुंबई परिसरातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, येऊर, कर्नाळा, तानसा तुंगारेश्वर, कृष्णगिरी उपवन, तुळशी अशा जंगलातील पाणवठ्यांवर वन्यजीव गणना करण्यात आली. या ठिकाणी कृत्रिम व नैसर्गिक पाणवठे व लाकडी मचाण तयार करण्यात आले होते. दुर्बीण, ट्रॅप कॅमेरे, स्वयंचलित कॅमेरे इत्यादी साधनांद्वारे वन्यजीव गणना करण्यात आली.