जमीर काझी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : खोटे प्रतिज्ञापत्र व कागदपत्राद्वारे गृहनिर्माण सोसायटीची स्थापना करून शासन व म्हाडाची सुमारे ४० कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात सोसायटीच्या माजी पदाधिकाऱ्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये एक साहाय्यक पोलीस आयुक्त, माजी पोलीस निरीक्षक आणि प्रत्येकी दोन हवालदार व बांधकाम व्यावसायिकांचा समावेश आहे.रेल्वे पोलीस दलातील साहाय्यक आयुक्त सुरेश परब, निवृत्त निरीक्षक अनिल जैतापकर, हवालदार सुरेश शिंदे, हवालदार वल्लभ पांगे, बायोबिल्ड डेव्हलपर्स कंपनीचे आनंद पाटील व सय्यद शमशुद्दीन अशी त्यांची नावे आहेत. शिंदे व पागे हे मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत.मुंबईत स्वत:च्या नावावर घर असतानाही खोट्या शपथपत्राच्या आधारे म्हाडाकडून रास्तभावाने भूखंड घेऊन टॉवर उभारला. त्याचप्रमाणे शासन व म्हाडाच्या २० टक्के घरांची परस्पर विक्री करून हा अपहार केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर म्हाडाने चौकशी करत या गैरव्यवहाराबाबत ही कारवाई केली आहे. २००३ ते २०१३ या कालावधीत हा अपहार करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.जैतापकर हे विधान भवनात सुरक्षा अधिकारी असताना त्यांनी म्हाडा अधिनियमांतर्गत भूखंड घेत टिळकनगरात महालक्ष्मी हाउसिंग को-आॅपरेटिव्ह सोसायटी बांधली आहे. त्या कार्यकारिणीमध्ये परब हे सचिव तर हवालदार शिंदे व पांगे हे सदस्य आहेत. मात्र त्यांनी त्यापूर्वी मुख्यमंत्री कोट्यातून मुलुंड येथे फ्लॅट घेतल्याचे, त्याचप्रमाणे सभासदाच्या सदनिकांची आदलाबदल करणे, शासन व म्हाडासाठी देय असलेल्या २० टक्के फ्लॅट, दुकाने व शेअर्सची परस्पर विक्री आणि अनधिकृतपणे व्यायामशाळा सुरू करून शासन व म्हाडाची कोट्यवधीची फसवणूक केल्याबाबतची जनहित याचिका युवराज सावंत यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाच्या निर्देशानंतर म्हाडाने या प्रकरणाची चौकशी करून पोलिसांकडे तक्रार केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सुनील काळे करीत आहेत.
चेंबूरमधील गृहनिर्माण सोसायटीत गैरव्यवहार
By admin | Published: June 12, 2017 3:10 AM