सदोष मोबाइलचे पैसे परत करा

By admin | Published: July 3, 2014 02:18 AM2014-07-03T02:18:41+5:302014-07-03T02:18:41+5:30

सॅमसंग कंपनीने त्यांच्या विक्रेत्यामार्फत विकलेला एक मोबाइल फोन मुळातच सदोष होता हे सिद्ध झाल्याने या दोघांनी त्या फोन खरेदीसाठी ग्राहकाने दिलेली सर्व रक्कम व्याजासह परत करावी -ग्राहक न्यायालय

Defective mobile payments | सदोष मोबाइलचे पैसे परत करा

सदोष मोबाइलचे पैसे परत करा

Next

मुंबई : सॅमसंग कंपनीने त्यांच्या विक्रेत्यामार्फत विकलेला एक मोबाइल फोन मुळातच सदोष होता हे सिद्ध झाल्याने या दोघांनी त्या फोन खरेदीसाठी ग्राहकाने दिलेली सर्व रक्कम व्याजासह परत करावी, असा आदेश ग्राहक न्यायालयाने दिला आहे.
माझगाव औद्योगिक वसाहतीतील एक उद्योजक सुनील दलाल यांनी दाखल केलेली फिर्याद मंजूर करून मध्य मुंबई जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने हा आदेश दिला. त्यानुसार माटुंगा येथील टॉप १० नोकिया मोबाइल शॉप हा विक्रेता आणि सॅमसंग इंडिया इलेक्ट्रॉनिक्स ही उत्पादक कंपनी या दोघांनी मिळून दलाल यांना जानेवारी २०१४ पासूनच्या ९ टक्के व्याजासह मोबाइलची सर्व किंमत महिनाभरात परत करायची आहे.
याखेरीज कंपनी व विक्रेता यांनी दलाल यांना झालेल्या मनस्तापापोटी १० हजार रुपये व दाव्याच्या खर्चापोटी दोन हजार रुपये द्यावेत, असाही आदेश जिल्हा मंचाचे अध्यक्ष बी. एस. वासेकर व सदस्य एच. के. भैसे यांनी दिला. विशेष म्हणजे फिर्याद दाखल केल्यापासून चार महिन्यांत हा निकाल दिला गेला. प्रतिवादींना रीतसर नोटिसा काढूनही त्यांच्यातर्फे कोणीही हजर न राहिल्याने हा निकाल एकतर्फी दिला गेला. फिर्यादी दलाल यांच्यातर्फे अ‍ॅड.अविनाश गोखले व अ‍ॅड. निकेतन नाखवा यांनी काम पाहिले.
तक्रारी करूनही व नंतर कायदेशीर नोटीस पाठवूनही कंपनी किंवा विक्रेत्याने फोनमधील दोष दूर केले नाहीत म्हणून ही फिर्याद दाखल केली गेली होती. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Defective mobile payments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.