मुंबई : मुंबईच्या फोर्ट भागातील एचडीएफसी बॅंकेने कार्यालयाच्या बाहेर बसविलेली टोकदार खिळ्यांची पट्टी हटविली आहे.एचडीएफसीच्या बॅंकेने कार्यालयाच्या दारात रात्रीच्या वेळी बेघर लोकांनी झोपू नये, यासाठी टोकदार खिळ्यांची पट्टी बसविली होती. मात्र, यासंदर्भातील फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आणि या प्रकारावर नेटकऱ्यांनी बँकेवर प्रचंड टीका केली. त्यानंतर बॅंकेने बसविलेली टोकदार खिळ्यांची पट्टी हटविण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, बॅंकेने बसविलेल्या या खिळ्यांच्या पट्टीचे फोटो सिमॉन मुंडे या व्यक्तीने 26 मार्च रोजी आपल्या ट्विटरवर अपलोड केले होते. या फोटोवर अनेक ट्विटर युजर्सने प्रतिक्रिया दिल्या असून बँकेला खडे बोल सुनावले आहेत. त्यांनी म्हटले आहे, बेघरांसाठी बँकेने केलेल्या या प्रतापामुळे एखादी व्यक्ती जर चुकून त्यावर पडली तर त्याचा जीव जाऊ शकतो किंवा तो गंभीर जखमी होऊ शकतो. तसेच दुसऱ्या एकाने म्हटले आहे की, बेघरांबाबतचा बँकेचा दृष्टीकोन स्पष्ट होतो. इतकेच नव्हे तर पादचारी फुटपाथवरुन चालत असताना गर्दीच्यावेळी चुकून धक्का लागून या खिळ्यांवर पडला तर काय होईल.
याचबरोबर, अशाप्रकारचे खिळ्यांची पट्टी लावण्याचा हा प्रकार पहिलाच नाही. 2017 मध्ये ब्रिस्टोल आणि इंग्लंडमध्ये अशा प्रकारचे खिळ्यांची पट्टी झाडांवर लावण्यात आली होती. पक्षांनी फांद्यांवर बसू नये यासाठी तो उपाय करण्यात आला होता.