मालेगाव बॉम्बस्फोट: खटला इन-कॅमेरा चालवण्याच्या एनआयएच्या अर्जावर आरोपीचा आक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 02:35 AM2019-09-10T02:35:35+5:302019-09-10T02:36:21+5:30
मालेगाव बॉम्बस्फोटाचा खटला इन-कॅमेरा चालवावा, यासाठी एनआयएने गेल्या महिन्यात विशेष एनआयए न्यायापुढे अर्ज केला
मुंबई : मालेगाव २००८ बॉम्बस्फोटाचा खटला इन-कॅमेरा चालविण्याच्या राष्ट्रीय तपास पथकाच्या(एनआयए) अर्जावर या खटल्यातील आरोपी समीर कुलकर्णीने सोमवारी आक्षेप घेतला.
एनआयएने आतापर्यंत बॉम्बस्फोटाचा एकही खटला इन-कॅमेरा चालविण्याची विनंती कोणत्याच न्यायालयाला केली नाही. यापूर्वी एनआयएने अहमदाबाद न्यायालयाला अशी विनंती केली होती, परंतु न्यायालयाने ती फेटाळली, अशी माहिती कुलकर्णीने विशेष न्यायालयाचे न्या. विनोद पडळकर यांना दिली.
मालेगाव बॉम्बस्फोटाचा खटला इन-कॅमेरा चालवावा, यासाठी एनआयएने गेल्या महिन्यात विशेष एनआयए न्यायापुढे अर्ज केला. खटला इन-कॅमेरा झाल्यास न्यायाधीश, सरकारी वकील, बचावपक्षाचे वकील, आरोपी व साक्षीदारच खटल्यास उपस्थित राहू शकतात. प्रसारमाध्यामांना या खटल्याचे वृत्तांकन करता येणार नाही. त्यामुळे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनीही एनआयच्या या अर्जावर विशेष न्यायालयात मध्यस्थी अर्ज दाखल केला. त्यापाठोपाठ या खटल्यातील आरोपी समीर कुलकर्णी यानेही एनआयच्या अर्जावर आक्षेप घेतला.
१९९३ साखळी बॉम्बस्फोट खटल्याची सुनावणीही इन-कॅमेरा घेण्यात आली नाही. प्रसारमाध्यमांनी जबाबदारीने वृत्तांकन केले. सरकारी वकिलांच्या केसलाही धक्का लागला नाही, असे कुलकर्णी याने न्यायालयाला सांगितले. जाणूनबुजून या खटल्यास विलंब करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी विनंतीही कुलकर्णी याने न्यायालयाला केली.
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट खटल्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्याचा अर्ज २९ आॅगस्ट रोजी उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. कुलकर्णीशिवाय या खटल्यात भाजपची नवनिर्वाचित खासदार प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, सुधाकर द्विवेदी, अजय राहीरकर आणि सुधाकर चतुर्वेदी हेही आरोपी आहेत.
पीडितांच्या नातेवाइकांचे एनआयएला समर्थन
‘आरोपी क्रमांक ९ (लेफ्ट. कर्नल प्रसाद पुरोहित) याला न्यायालयाने विधि साहाय्य पुरवावे. त्यामुळे तो खटल्यास विलंब करणार नाही,’ असे कुलकर्णी याने अर्जात म्हटले आहे. दरम्यान, पीडितांच्या काही नातेवाइकांनी एनआयएच्या अर्जाचे समर्थन करण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.