लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एकमेकांवर नोंदविण्यात आलेला गुन्हा रद्द करताना उच्च न्यायालयाने आठ जणांना वर्सोवा बीच स्वच्छ करण्याच्या मोहिमेत सहभागी होण्याचे निर्देश दिले. पुढील सहा महिने या आठ जणांना महिन्यातील दुसरा व चौथा रविवार हा मोहिमेत सहभागी व्हावे लागणार आहे.महाविद्यालयीन तरुणांच्या दोन गटांमध्ये वाद झाले. त्यामुळे एकमेकांवर गुन्हा नोंदविण्यात आला. हा गुन्हा रद्द करण्यासाठी दोन्ही गटांतील तरुणांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या. याचिकांवरील सुनावणी न्या. पी. बी. वराळे व न्या. एस. एम. मोडक यांच्या खंडपीठापुढे झाली. आरोपींवर खंडणी मागणे, जाणूनबुजून दुखापत करणे, धाकदपटशा दाखविणे इत्यादी आरोपांतर्गत पहिला गुन्हा २७ एप्रिल २०१० रोजी आंबोली पोलीस ठाण्यात दाखल झाला. तक्रार नोंदविताना तक्रारदार अल्पवयीन होती.
प्रकरण न्यायप्रविष्ट असताना दोन्ही पक्षांनी हे प्रकरण आपापसांत सोडविले आणि गुन्हा रद्द करण्यासाठी एकमेकांना सहकार्य करण्याचेही ठरवले. मुलाने व मुलीने गुन्हा रद्द करण्यासंदर्भात स्वतंत्र प्रतिज्ञापत्र दाखल केले. ‘दोन्ही पक्षांमध्ये झालेल्या तडजोडीचा विचार केला असता आता गुन्ह्यांबाबत पुढील कारवाई करण्यात अर्थ नाही. ते व्यर्थहीन असेल. भविष्यात, त्यांना न्यायालयात जाण्याची आवश्यकता नाही. दोन्ही पक्षांनी एकमेकांवर आरोप केले आणि पैसे घेतले,’ असे निरीक्षण नोंदवित न्यायालयाने दोन्ही पक्षांवरील गुन्हा रद्द केला. मात्र, गुन्हा रद्द करताना न्यायालयाने आठ जणांना पुढील सहा महिने दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या रविवारी व्यवसायाने वकील असलेल्या व पर्यावरणवादी कार्यकर्ते अफ्रोज शाह यांच्या वर्सोवा बीच स्वच्छ करण्याच्या मोहिमेत सहभाग घेण्याचे निर्देश दिले.
मुलीची तक्रार : पहिला गुन्हा नोंद मुलीच्या तक्रारीनुसार, मित्राने तिला घरी बोलाविले. त्यावेळी त्याच्याशिवाय त्याचेही मित्र होते. त्यांनी तिच्या ड्रिंकमध्ये काहीतरी मिसळवले आणि तिचे अश्लील फोटो काढले. त्यावरून तिचे मित्र तिला ब्लॅकमेल करत आणि पैशांची मागणी करत. २४ एप्रिल २०१० रोजी पुन्हा तिच्या मित्रांनी पैशांसाठी व सोन्याच्या बांगड्या देण्यासाठी तिला ब्लॅकमेल केले. पैसे न दिल्यास तिचे फोटो सगळीकडे पाठविण्याची धमकी दिली. गुन्हा नोंदविल्यावर पोलिसांनी सदर प्रकरणाचा तपास केला आणि आरोपपत्र दाखल केले.
मुलाची तक्रार : दुसरा गुन्हा नोंददुसरा गुन्हा १ मे २०१० रोजी चारकोप पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला. २३ एप्रिल २०१० रोजी घडलेल्या घटनेविषयी हा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी तक्रारदार मुलगा होता. तक्रारीनुसार, त्याला व त्याच्या मित्रांना मुलीच्या घरी बोलविण्यात आले. संबंधित तक्रारदार मुलगा आणि मुलीचे प्रेमसंबंध असताना मुलीने दिलेले पैसे परत करण्याची जबरदस्ती त्याच्यावर करण्यात आली. त्यावेळी मुलाने ५० हजार रुपये रोख व त्याची मोटारसायकल मुलीच्या कुटुंबाला दिली. पैसे न दिल्यास जिवे मारण्याची धमकी मुलाला दिली होती.