मुंबई : वेदांत गाडियाच्या अर्धशतकी खेळी आणि कुश जैनचा चार बळीच्या जोरावर गतविजेत्या नमन पय्याडे क्रिकेट अकादमी संघाने व्हीनस स्पोटर््स अकादमी संघावर ५० धावांनी मात केली. या विजयामुळे पय्याडे संघाने १४ वर्षांखालील चौथ्या लिटिल चॅम्पियन लीग क्रिकेट स्पर्धेत विजयी सलामी दिली. वेदांतची ‘चॅम्प आॅफ द मॅच’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.गोरेगाव येथील व्हीनस मैदानावर चॅम्पियन लीगचे आयोजन करण्यात आले आहे. १४ वर्षांखालील जास्तीतजास्त खेळाडूंना खेळण्याची संधी मिळावी म्हणून या लिगमध्ये ३० षटकांचे सामने खेळवण्यात येत आहे. शिवाय आठव्या, १६ आणि २४ व्या षटकांनतर खेळाडू बदलण्याची सुविधा देखील या लिगमध्ये संघांना देण्यात आली आहे. १६ एप्रिल ते १४ मे पर्यंत चॅम्पियन लिग खेळवण्यात येणार आहे.स्पर्धेचा उद्घाटनीय सामना पय्याडे विरुद्ध व्हीनस अकदमी संघ यांच्यात रंगला. पय्याडे संघाच्या १८८ धावांचा पाठलाग करताना व्हीनस संघाने निर्धारित षटकात ८ बाद १३८ धावांपर्यंतच मजल मारली. पय्याडेच्या कुश जैनने अचूक मारा करत प्रतिस्पर्धी फलंदाजांनी जेरीस आणले. कुशने ५ षटकात २६ धावा देत ४ फलंदाजांना तंबूत धाडले. व्हीनस संघाच्या सिद्धांत बैदने २३ चेंडूत ३३ धावांची एकाकी झुंज दिली. मात्र दुसऱ्या बाजूने गडी बाद होत राहिल्याने त्याची खेळी व्यर्थ गेली.दरम्यान, गतविजेत्या पय्याडे संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी केली. पय्याडेच्या वेंदात गाडियाने अर्धशतक झळाकावले. वेदांतने ४३ चेंडूत ५४ धावांची खेळी केली. वेदांतच्या शानदार खेळामुळे पय्याडे संघाने चौथ्या चॅम्पियन लीगची सुरुवात विजयाने केली. (क्रीडा प्रतिनिधी)
गतविजेत्या पय्याडे संघाची विजयी सलामी
By admin | Published: April 17, 2017 3:53 AM