संरक्षण दलांची बचाव पथके अहोरात्र कार्यरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:06 AM2021-07-26T04:06:24+5:302021-07-26T04:06:24+5:30
मुंबई : महाराष्ट्रासह कर्नाटक आणि गोव्याला अतिवृष्टीने तडाखा दिला आहे. या नैसर्गिक आपत्तीत भारतीय लष्करासह नौदल आणि हवाई दलाच्या ...
मुंबई : महाराष्ट्रासह कर्नाटक आणि गोव्याला अतिवृष्टीने तडाखा दिला आहे. या नैसर्गिक आपत्तीत भारतीय लष्करासह नौदल आणि हवाई दलाच्या कृती पथकांनी मदत आणि बचावकार्यात आघाडी घेतली आहे. राज्यातील रत्नागिरी, कोल्हापूर आणि सांगली हे तीन जिल्हे सर्वाधिक प्रभावित झाले असून इथे संरक्षण दलांच्या बचाव पथकांसह वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि दळणवळण पथके स्थिती अव्याहतपणे कार्यरत आहेत.
स्थानिक नागरी प्रशासनासोबतच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या समन्वयाने संरक्षण दलांच्या विविध पथकांचे काम सुरू आहे. या पथकांनी चिपळूण, शिरोळ, हातकणंगले, पलूस आणि मिरज भागात अनेकांचे प्राण वाचवले आहेत. संरक्षण दलांच्या पथकांनी पहिल्या टप्प्यात पूरग्रस्त भागात अडकलेल्या लोकांचा शोध आणि बचावाला प्राधान्य दिले होते. दुर्घटनाग्रस्त नागरिकांपर्यंत अन्नपदार्थ, पाणी, वैद्यकीय साहित्य पोहोचविण्यासाठी ही पथके चोवीस तास कार्यरत आहेत. याशिवाय, अतिरिक्त पथके आणि विमाने सुसज्ज ठेवण्यात आली आहेत.
कर्नाटकातील पूरस्थितीचा मुकाबला करण्यासाठी नौदलाची सात पथके कार्यरत आहेत. नौदलाचे प्रशिक्षित डायव्हर्स, रबरी बोट, जीवरक्षक जॅकेटसह आवश्यक वैद्यकीय साहित्यासह ही पथके बचावकार्यात गुंतली आहेत. कादरा धरणाजवळील सिंगुड्डा आणि भैरे या गावातून १६५ लोकांना सुखरूपपणे बाहेर काढले, तर ७० लोकांना कैगाच्या सखल भागातून बाहेर काढण्यात या पथकांना यश मिळाले आहे.
नौदलाची टेहाळणी विमानांसह हेलिकाॅप्टर्स हवाई दलाची विमाने मदतकार्यात गुंतली आहेत. खराब हवामान आणि अचानक पाण्याची पातळी वाढल्याने अडकून पडलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी हेलिकाॅप्टर्सनी अनेक फेऱ्या केल्या. याशिवाय, मदतकार्याची रूपरेषा ठरविण्यासाठी, पूरस्थितीचा अंदाज घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत हवाई पाहणी करण्यात आली. हवाई दलाने पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरीतील बचावकार्यासाठी भुवनेश्वर, कोलकाता आणि वडोदरा येथून एनडीआरएफच्या ४०० जवानांना आणले. तर, गोव्यात ४० टन बचाव सामग्री पाठविण्यात आली.