भारत जगासाठीही जहाज बांधणी करेल; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 05:41 AM2022-05-18T05:41:37+5:302022-05-18T05:42:19+5:30
भारतीय नौदलासाठी बांधलेल्या सूरत ही विनाशिका आणि उदयगिरी या युद्धनौकेचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत जलावतरण झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : माझगाव गोदीत बांधण्यात आलेल्या उदयगिरी आणि सूरत या भारतीय युद्धनौकांची गणना जगातील सर्वांत अत्याधुनिक क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकांमध्ये केली जाईल. स्वदेशी बनावटीच्या या युद्धनौकांनी जहाजबांधणी क्षेत्रातील भारताची क्षमता सिद्ध केली आहे. येत्या काळात भारत जगासाठीही जहाजबांधणी करेल, असा विश्वास केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी व्यक्त केला.
भारतीय नौदलासाठी माझगाव शिपबिल्डर्स लिमिटेडने बांधलेल्या सूरत ही विनाशिका आणि उदयगिरी या युद्धनौकेचे मंगळवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत जलावतरण झाले. यावेळी सिंह यांच्यासह भारतीय नौदलाचे प्रमुख ॲडमिरल आर. हरिकुमार, एमडीएलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक नारायण प्रसाद, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खा. अरविंद सावंत, आ. आशिष शेलार, यामिनी जाधव यांच्यासह नौदल आणि एमडीएलचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. एकाच वेळी दोन युद्धनौकांच्या जलावतरणाची ही पहिलीच वेळ होती.
सिंह म्हणाले की, जगतिक सुरक्षा, सीमावाद आणि सागरी वर्चस्वामुळे जगभरात सैन्याचे आधुनिकीकरण आवश्यक बनले आहे. जागतिक संदर्भ झपाट्याने बदलत आहेत. देशाच्या मुख्य भूमिपासून लांब अंतरावरही आर्थिक आणि सामरिक हितसंबंध जपायचे असतील तर अशा सुदूर क्षेत्रातही संरक्षण सिद्धता आणि सामर्थ्याचे प्रकटीकरण आवश्यक आहे. यात भारतीय नौदलाची भूमिका महत्त्वाची असणार आहे. त्यादृष्टीने नौदलाचे आधुनिकीकरण सुरू असून आत्मनिर्भरतेकडे आपली वाटचाल सुरू आहे, असेही ते म्हणाले.
चीनला अप्रत्यक्ष इशारा
इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील भारतीय नौदलाच्या सामर्थ्याचा संरक्षण मंत्र्यांनी स्पष्ट शब्दात पुनरुच्चार केला. जागतिक व्यापारात या क्षेत्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जगातील एकूण तेल निर्यातीपैकी दोन तृतीयांश, मालवाहतुकीत एक तृतीयांश आणि निम्मी कंटेनर वाहतूक या क्षेत्रातून केली जाते. त्यामुळे हे क्षेत्र सुरक्षित आणि खुले राहायला हवे. जागतिक नियमानुसार इथे कारभार चालावा यासाठी भारतीय नौदल आपली भूमिका निश्चितपणे पार पाडेल, असे सांगत राजनाथ सिंह यांनी अप्रत्यक्षपणे चीनला इशारा दिला.
- नौदलाच्या शस्त्रागाराचे ९० टक्के स्वदेशीकरण करण्यात आपल्याला यश आल्याचे सांगून सिंह म्हणाले, की मागील पाच आर्थिक वर्षांत नौदलाच्या आधुनिकीकरणासाठी केलेल्या खर्चापैकी दोन तृतीयांश निधी स्वदेशी भागांसाठी केला गेला. तर, नौदलाने मागविलेल्या ४१ युद्धनौका आणि पाणबुड्यांपैकी ३९ या स्वदेशी बनावटीच्या आहेत, असेही संरक्षण मंत्री म्हणाले.