संरक्षण उत्पादन कंपन्या भारताच्या उंबरठ्यावर : जॅन विडरस्टॉर्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 01:58 AM2018-02-26T01:58:40+5:302018-02-26T01:58:40+5:30
‘मेक इन इंडिया’ मुळे विदेशी संरक्षण उत्पादन कंपन्या भारताकडे कूच करीत आहेत. आता त्या भारताच्या उंबरठ्यावर आहेत. पण भारताने संरक्षण सामग्री उत्पादन धोरणात आणखी लवचिकता निर्माण केल्यास मोठ्या रोजगारासह या कंपन्या येथे सामग्री निर्मितीसाठी गुंतवणूक करतील
चिन्मय काळे
मुंबई : ‘मेक इन इंडिया’ मुळे विदेशी संरक्षण उत्पादन कंपन्या भारताकडे कूच करीत आहेत. आता त्या भारताच्या उंबरठ्यावर आहेत. पण भारताने संरक्षण सामग्री उत्पादन धोरणात आणखी लवचिकता निर्माण केल्यास मोठ्या रोजगारासह या कंपन्या येथे सामग्री निर्मितीसाठी गुंतवणूक करतील, असा विश्वास ‘साब’ या जगप्रसिद्ध स्विडीश संरक्षण उत्पादन कंपनीचे भारत प्रमुख जॅन विडरस्टॉर्म यांनी व्यक्त केले.
‘मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्हव्हर्जन्स’ या गुंतवणूक परिषदेत राज्यातील संरक्षण हबमधील गुंतवणुकीच्या संधी शोधण्यासाठी विडरस्टॉर्म हे मुंबईत आले होते. त्यावेळी ‘लोकमत’ने विडरस्टॉर्म यांच्याशी केलेल्या विशेष चर्चेत त्यांनी विदेशी कंपन्या पूर्ण जोमाने भारतात येण्यास तयार असल्याचे मत मांडले.
भारताला लढाऊ विमान क्षेत्रात आकड्यांची गरज आहे. भारत सध्या लढाऊ विमान स्वत: तयार करू शकत नाही. पण विदेशी कंपन्या त्यांना हे सहकार्य देण्यास पूर्णपणे तयार आहेत. भारतीय हवाईदलाला किमान आठ स्क्वॉड्रन्सची गरज आहे. धोरण आणखी खुले केल्यास ही गरज लवकर पूर्ण होईल. यासाठीच साबसारख्या कंपन्या त्यांच्याकडील लढाऊ विमाने भारताला देण्यास तयार आहेत. अशा लढाऊ विमानांसह संरक्षण सामग्रींची निर्मिती भारतात मोठ्या प्रमाणात होऊ शकते. त्यासाठी विदेशी कंपन्या तयार आहेत. या क्षेत्रातील महागुंतवणूक भारतात येण्याच्या प्रतिक्षेत आहे. येता काळ त्यादृष्टीने महत्त्वाचा असेल, असा विश्वास विडरस्टॉर्म यांनी व्यक्त केला.